पंचायत सिझन 5 कधी येणार? रिलीजबाबत मोठी अपडेट; 'या' दिवशी कळणार सचिवजी फुलेरात राहणार की नाही!
हा ठरावीक अंतराने होणारा रिलीज पॅटर्नच प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवतो. चौथ्या सिझनने तर सर्वच विक्रम मोडले.

Panchayat Season 5: वेबविश्वात पंचायत ही सिरीज जितकी लोकप्रिय आहे, तितकीच चर्चेत राहते ती तिच्या प्रत्येक सिझनमधील मोठ्या गॅपमुळे. इतर वेगवान वेब सीरिजप्रमाणे पंचायत दरवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत नाही. उलट, प्रत्येक सिझनसाठी प्रेक्षकांना संयमाने वाट पाहावी लागते आणि कदाचित हाच तिच्या यशाचा मोठा फॉर्म्युला ठरत आहे. चाहते नव्या सीजन ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. याबाबत नुकतीच एक अपडेट समोर आली आहे ज्यामुळे चहात्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सीझनमधील मोठे गॅप
पंचायतचा पहिला सिझन 3 एप्रिल 2020 रोजी रिलीज झाला. त्यानंतर दुसऱ्या सिझनसाठी प्रेक्षकांना तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली आणि अखेर 18 मे 2022 रोजी सिझन 2 प्रदर्शित झाला. दुसरा आणि तिसरा सिझन यांच्यातही असाच मोठा कालावधी गेला. तिसरा सिझन 28 मे 2024 रोजी आला. मात्र चौथ्या सिझनसाठीची वाट पाहणं थोडंसं कमी झालं. अवघ्या एक वर्ष आणि एका महिन्यानंतर, म्हणजे 24 जून 2025 रोजी पंचायत सिझन 4 प्रेक्षकांच्या भेटीला आला.
हा ठरावीक अंतराने होणारा रिलीज पॅटर्नच प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवतो. चौथ्या सिझनने तर सर्वच विक्रम मोडले. भारतातच नव्हे, तर परदेशातही या सिझनला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असूनही पंचायतने जागतिक प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे.
चौथा सिझन रिलीज होताना प्राइम व्हिडिओ इंडियाचे डायरेक्टर आणि हेड ऑफ कंटेंट लायसन्सिंग मनीष मेंघानी यांनी या यशावर भाष्य केलं होतं. पहिल्याच आठवड्यात 180 पेक्षा अधिक देशांमध्ये मिळालेला प्रतिसाद हा पंचायतच्या सांस्कृतिक प्रभावाचा पुरावा असल्याचं त्यांनी सांगितलं. वास्तववादी आणि प्रामाणिक कथाकथनासाठी या मालिकेने डिजिटल प्लॅटफॉर्मवर नवे मापदंड निर्माण केल्याचंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, निर्मातेही या मालिकेबाबत प्रतिक्रिया देताना दिसतात.
पंचायत सिझन 5 कधी येणार?
याबाबत अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार सिझन 5 ची प्रक्रिया सुरू झाली असून लेखनाचं काम सध्या सुरू आहे. सर्व काही नियोजनानुसार झालं, तर सिझन 5 पुढील वर्षाच्या मध्यात किंवा 2026 मध्ये कधीतरी रिलीज होऊ शकतो. शूटिंग यावर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच प्रेक्षकांना पंचायत सिझन 5 साठी मे किंवा जून 2026 पर्यंत वाट पाहावी लागू शकते.
काय आहे पंचायतचे कथानक?
या वेब सिरीजची कथा फुलेरा ग्रामपंचायतवर केंद्रित आहे. जिथे एक शहरातील मुलगा एका लहान गावात सचिव म्हणून येतो आणि गावातील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. चौथ्या सीजन पर्यंत सेक्रेटरी अभिषेकला गावकऱ्यांनी स्वीकारलेले आहे आणि सेक्रेटरीजी आता गावातील वातावरणाशी जुळवून घेत आहेत. सीजन 5 मध्ये सेक्रेटरीजीची बदली होते की नाही? त्याची आणि रिंकीची प्रेम कथा कशी पुढे जाते हे पाहण्यासाठी प्रेक्षक पुढच्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या कथानकात जितेंद्र कुमार मुख्य भूमिकेत झळकतो, तर नीना गुप्ता, रघुबीर यादव यांच्यासह अनेक दमदार कलाकार मालिकेला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी ही मालिका तयार केली असून पटकथा चंदन कुमार यांची आहे. दिग्दर्शन अक्षत विजयवर्गीय आणि दीपक कुमार मिश्रा यांनी केलं आहे. फुलेरा गावातील साधं जग, रोजच्या समस्या आणि माणुसकीची गोष्ट सांगणारी पंचायत पुन्हा एकदा नव्या सिझनसह परतणार आहे. तोपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता आणि प्रतीक्षा कायम राहणार, हे मात्र नक्की.























