Samantar 2 : ट्रोल तेच होतात जे चर्चेत असतात : तेजस्विनी पंडीत
Samantar 2 : समांतर 2 या मराठी वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यातील मिस्टर आणि मिसेस महाजन यांच्यातला इंटिमेट सीन चर्चेचा विषय ठरला. यामुळे अभिनेत्री तेजस्विनी पंडितला भल्या बुऱ्या प्रतिक्रियांना समोरं जावं लागलं.
मुंबई : समांतर 2 चा नवा सीझन आता यायच्या मार्गावर आहे. त्याचा ट्रेलरही आला आहे. पहिल्या सीझनला नेटिझन्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कुमार महाजनला पडलेले प्रश्न आणि त्याच्या समोर आलेल्या वहीने अनेकांची उत्कंठा वाढवली. आता दुसऱ्या सीझनमध्ये कुमारसमोर नवीन काय वाढून ठेवलं आहे त्याची लोक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. गेल्या सीझन गाजलाच. पण त्याचवेळी समांतरमधल्या एका दृश्याची खूप चर्चा झाली. तो होता मिस्टर आणि मिसेस महाजन यांच्यातला इंटिमेट सीन. त्यावरून तेजस्विनी पंडितला भल्या बुऱ्या प्रतिक्रियांना समोरं जावं लागलं. आता दुसऱ्या सीझनच्या निमित्ताने तेजस्विनीशी बातचित करताना तिने अनेक प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरं दिली.
तेजस्विनी पंडित एबीपी माझाशी बोलताना म्हणाली, समांतरच्या पहिल्या भागामध्ये मला खूपच कमी काम होतं. पण दुसऱ्या सीझनमध्ये निमा महाजन साकारण्याला वाव असणार आहे असं मला आधीच सांगण्यात आलं होतं. असं असलं तरी काहीतरी चांगलं मराठीत बनू पाहात होतं. अशावेळी अशा प्रोजेक्टचा आपण हिस्सा असायला हवं असं वाटलं म्हणूनच मी समांतर स्विकारली. त्याला लोकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे उत्साह वाढला.' तेजस्विनी आणि स्वप्नीलमधल्या इंटिमेट सीनची खूप चर्चा गेल्यावेळी झाली होती. त्याबद्दलही तेजस्विनीने मोकळेपणानं उत्तर दिलं. ती म्हणाली, आम्ही अभिनय करत असतो. ती व्यक्तिरेखा रंगवताना त्याची गरज म्हणून काहीवेळी असे सीन द्यावे लागतात तो त्या कथानकाचा, व्यक्तिरेखेचा भाग असतो. शिवाय अशी दृश्य देणं सोपं नसतं. लोकांना ट्रोल करणं सोपं आहे. पण लोकही अशाच लोकांना ट्रोल करतात जे चर्चेत असतात. सुरुवातीला त्याची चर्चा झाली. पण नंतर समांतरचा पहिला सीझन इतका गाजला की ही गोष्ट मागे पडली.
तेजस्विनी पंडितने या सीझनमध्ये निमा महाजन यांची भूमिका साकारली आहे. दुसऱ्या सीझनच्या ट्रेलरमध्ये जी दृश्य दिसतायत त्यानुसार निमा महाजनला या नव्या सीझनमध्ये भरपूर वाव आहे असं म्हणायला हरकत नाही. ती म्हणाली, या नव्या सीझनमध्ये काम करायला खूप चान्स आहे. खरंतर या नव्या सीझनमध्ये माझ्या वाट्याल जे सीन आलेत ते मी साकारण्याचा प्रय्तन केला आहे. त्यात कुमार महाजनसोबतचा माझा एक सीन खूप चांगला झाला आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यात मी कुमारला मारते. असे काही सीन साकारायला मजा आली. तितकाच कसही लागला.
समांतरप्रमाणेच हिंदीत चर्चा फॅमिली मॅनची होती. फॅमिली मॅनचा पहिला सीझन आला. तसा दुसराही. तोही गाजला. आता तिसऱ्या सीझनची चर्चा सुरू आहे. समांतरबाबतही पहिला सीझन गाजला. दुसरा आता यायच्या मार्गावर आहे. हा जर गाजला तर तिसरा सीझन येईल का यावर बोलताना तेजस्विनी म्हणाली, खरंतर हे लिखाण दोनच सीझनचं आहे. पण पाहणाऱ्यांना सीझन आवडला आणि त्यांनी मागणी केली तर निर्माते कदाचित याचा तिसरा सीझन आणण्याचा विचारही करतील. पण आत्ता त्याबद्दल काही सांगता येणार आहे.
तेजस्विनी पंडितसोबतचा हा संवाद व्हिडिओ स्वरुपातही पाहता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :