एक्स्प्लोर
अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावेत ही राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा
अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राष्ट्रवादीसोबत बंडखोरी केली. मात्र पुन्हा स्वगृही परत येत आता पक्षासाठी शरद पवार सांगतील तसं काम करण्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता पुन्हा त्यांनाच उपमुख्यमंत्री करावं अशी इच्छा काही आमदारांनी व्यक्त केली आहे.
मुंबई: अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र बहुमत होत नसल्याचे दिसताच पुन्हा त्यांनी घरवापसी केली. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत त्यांनी पुन्हा स्वगृही येण्याचा निर्णय घेतला आहे. आता उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रीपदं असणार आहेत. यातील एक काँग्रेसला तर दुसरं राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे.
राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारं उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांना मिळावं आणि नव्या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री असावेत अशी इच्छा राष्ट्रवादीच्या आमदारांची असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना शेळके यांनी सांगितले की, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांनी देखील शपथ घ्यावी अशी इच्छा राष्ट्रवादीच्या आमदारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यक्त केली आहे. शेळके म्हणाले की, अजित पवार यांच्या परत येण्याने आनंद झाला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवार हेच उपमुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र शरद पवार जे निर्णय घेतील तेच सर्वांना मान्य असेल, असेही शेळके म्हणाले.
हे ही वाचा - जे झालं ते झालं, आता नवी सुरुवात करायची : अजित पवार
महाविकासआघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा काल करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. उद्या २८ तारखेला उद्धव ठाकरे हे सायंकाळी ६.४० मिनिटांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यानुसार दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. यामध्ये एक उपमुख्यमंत्री काँग्रेसचा तर दुसरा राष्ट्रवादीचा असेल. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांची नावं उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
आज सर्व आमदारांना शपथ विधानसभेत देण्यात आली. यावेळी विधानभवनात येणाऱ्या प्रत्येक आमदाराचे स्वागत सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी आलेल्या अजित पवार यांची गळाभेट घेत स्वागत केले. अजित पवार यांनी काल रात्रीच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement