Mrunal Dusanis : अभिजीत, चिन्मय, संतोष की शशांक? मृणाल दुसानिसला आवडेल 'या' अभिनेत्यासोबत पुन्हा काम करायला
Mrunal Dusanis : अभिनेत्री मृणाल दुसानिस हिला तिच्या कोणत्या सह कलाकारासोबत पुन्हा काम करायला आवडेल याविषयी तिने भाष्य केलं आहे.
Mrunal Dusanis : अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) हीने अभिनयातून ब्रेक घेतला आणि ती तिच्या नवऱ्यासोबत अमेरिकेत राहायला गेली. त्यानंतर आता चार वर्षांनी मृणाल भारतात परतली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मृणाल ही कोणत्या माध्यमातून आणि कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची देखील अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
मृणाल दुसानिस हिने झी मराठी वाहिनीवरील माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर छोट्या पडद्यावर मृणाल प्रेक्षकांच्या देखील तितकीच पसंतीस उतरली. तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई, हे मन बावरे या मालिकांमधून भेटीला आलेली ही सून प्रेक्षकांना फार आवडली. त्यानंतर आता पुन्हा कामाला सुरुवात करताना मृणालला कोणासोबत काम करायला जास्त आवडेल, याविषयी मृणालने भाष्य केलं आहे. तिने नुकतच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे.
मृणालने काय म्हटलं?
अभिजीत खांडकेकर, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर आणि शशांक केतकर यांच्यासोबत तू प्रमुख भूमिकेचं काम केलं आहे, यापैकी कोणासोबत पुन्हा काम करायला जास्त आवडेल? यावर मृणालने म्हटलं की, लोकांच्या ज्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येतात, त्यामध्ये लोकांना माझी आणि शशांकची जोडी पुन्हा एकदा बघायला आवडेल. मला अभिजीत सोबतही पुन्हा काम करायला आवडेल. कारण आमच्या दोघांची ती पहिलीच मालिका होती आणि दोघेही नवीन होतो. त्यानंतर आता खऊप वर्ष झाली मी अभिजीतला भेटलेच नाहीये. त्यामुळे मला त्याच्यासोबत काम करायला आवडेल. सगळ्यांसोबत पुन्हा काम करायला आवडेल, पण या दोघांसोबत तो नॉस्टॅलिजिया असल्यामुळे या दोघांसोबत पुन्हा काम करायला आवडेल.
बोल्ड सीन्स करण्यावर मृणालची प्रतिक्रिया
मृणालने म्हटलं की, 'जशी तुम्ही एखादी व्यक्तीरेखा करता तेव्हा असं वाटतं की, ती व्यक्ती तशीच आहे. म्हणजे मी ज्या काही भूमिका केल्या आहेत, लोकांना असं वाटतं मी तशीच आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी बोल्ड सीन्स करायला तयार आहे.पण कोणताही गोष्टी डिसेन्सीने दाखवायला हवी. जर ती गोष्ट डिसेन्सीने दाखवली आणि ती त्या कथेची गरजच असेल तर करायला काहीच हरकत नाही.'