Kiran Gaikwad Naad Movie : ''प्रेमात जो आडवा येणार त्याला आपण...'', 'देवमाणूस'फेम किरण गायकवाड अॅक्शन भूमिकेत
Naad Marathi Movie Motion Poster Release : 'नाद - द हार्ड लव्ह' या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटात किरणचं कडक, अॅक्शन रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरमधील किरणच्या लूकची सध्या चर्चा सुरू आहे.
Naad Marathi Movie Motion Poster Release : छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतच्या आजवरच्या प्रवासात नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा, तसेच महाराष्ट्रातल्या घरोघरी आपली 'देवमाणूस' ही ओळख निर्माण करणारा किरण गायकवाड एका नव्या रूपात समोर येणार आहे. 'नाद - द हार्ड लव्ह' या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटात किरणचं कडक, अॅक्शन रूप पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरमधील किरणच्या लूकची सध्या चर्चा सुरू आहे. 'नाद' हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांची निर्मिती असलेल्या 'नाद - द हार्ड लव्ह' चित्रपटाचे निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर आहेत. रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार यांनी निर्मिती व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली आहे. प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'नाद - द हार्ड लव्ह' या शीर्षकाला साजेशा फर्स्ट लुकनंतर प्रकाश पवार आणि त्यांच्या टिमने तितकंच दमदार मोशन पोस्टर रिलीज केलं आहे.
View this post on Instagram
'मिथुन', 'रांजण', 'बलोच' असे वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट देणारे प्रकाश पवार हे 'नाद' चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. पोस्टरवरून भन्नाट अॅक्शनपट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राखाडी रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेल्या किरण गायकवाडने मोशन पोस्टरवर लक्ष वेधून घेतले आहे. किरणचा चेहरा दाखवण्यापूर्वी त्याच्या उजव्या हातातील रक्तरंजित कोयता दिसतो. किरणच्या चेहऱ्यावर तसेच अंगावर जखमा असून, त्याच्या डोळ्यांत अन्यायाविरोधातील आग आहे. किरणने आपल्या डाव्या हाताने घाबरलेल्या अवस्थेतील नायिकेला कवटाळलं आहे. 'नाद'चं मोशन पोस्टर लक्ष वेधून घेणारं असून, चित्रपटात काय पाहायला मिळणार याबाबतची उत्सुकता वाढवणारं असल्याचं दिग्दर्शक प्रकाश पवार यांचं म्हणणं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना किरणचा एक नवा अवतार पाहायला मिळणार असून, या व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी त्याने खूप मेहनत केली असल्याचे पवार यांनी सांगितले. अभिनेत्री सपना मानेची अचूक साथ लाभली असून जरी हा तिचा पहिलाच चित्रपट असला तरी तिने एखाद्या मातब्बर अभिनेत्रीसारखे काम केले आहे. केवळ नायकाला साथ देणं इतकीच तिची भूमिका नसून, तिने दिलेला लढाही महत्त्वाचा आहे. एका नव्या जोडीची अफलातून केमिस्ट्री रसिकांना नक्कीच खिळवून ठेवेल असा विश्वासही प्रकाश पवार यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या लाल मातीतील खऱ्याखुऱ्या प्रेमाचे अनोखे कंगोरे उलगडण्याचं काम 'नाद' चित्रपट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. वैभव देशमुख यांच्या साथीने विनायक पवार यांनी गीतलेखनही केलं आहे. या चित्रपटात किरण आणि सपनाच्या जोडीला यशराज डिंबळेही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. डिओपी अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी, तर सतीश चिपकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं संगीत लाभलं आहे. कोरिओग्राफी सिद्धेश दळवीने केली आहे. सुजित मुकटे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. तुषार घोडेकर आणि संकेत चव्हाण यांनी लाइन प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं आहे.