Makarand Anaspure On Compulsion Of Hindi Language: शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा का नको? मकरंद अनासपुरेंनी सगळं उलगडून सांगितलं, म्हणाले...
Makarand Anaspure On Compulsion Of Hindi Language: पहिलीपासून हिंदी नकोच, अशी स्पष्ट भूमिका मकरंद अनासपुरे यांनी मांडली आहे. पण, का नको? हे त्यांनी उलगडूनही सांगितलं आहे.

Makarand Anaspure On Compulsion Of Hindi Language: महाराष्ट्रात (Maharashtra News) आता हिंदी भाषेवरून (Compulsion Of Hindi Language) नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्याचं कारण आहे इयत्ता पहिलीपासून हिंदी (Hindi Compulsion) विषयाची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यानं बदल लागू करण्यात येणार आहेत. त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, मराठी आणि इंग्रजीसोबत हिंदीच्या सक्तीचा. अनेक मराठी सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेमंडळींनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं आहे. अशातच आता मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही हिंदी सक्तीच्या मुद्यावर भाष्य केलं आहे. पहिलीपासून हिंदी नकोच, अशी स्पष्ट भूमिका मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी मांडली आहे.
मराठी सिनेसृष्टी (Marathi Film Industry) गाजवणारं आणि अगदी खेड्यापाड्यांतील साध्याभोळ्या लोकांपासून थेट शहरी भागांतील लोकांना खळखळून हसवणारं मराठमोळं नाव म्हणजे, मकरंद अनासपुरे. नुकतीच मकरंद अनासपुरेंनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मकरंद अनासपुरे नेमकं काय म्हणाले?
मकरंद अनासपुरे म्हणाले की, "पहिली इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती अजिबात असू नये. कारण, आपापल्या गरजेनुसार माणूस त्या त्या भाषांमध्ये संवाद साधतो. मी 'पिंजरेवाली मुनिया' नावाचा भोजपुरी सिनेमा केलाय. मला भोजपुरी येत नाही. पण, मी त्या सिनेमापुरतं बोललोय. त्यामुळे गरजेपुरतं आपल्याला ते करता येतं. दुसरं म्हणजे, इतक्या लहान वयात मातृभाषा मुलगा शिकत असताना त्याला हिंदीची सक्ती कशासाठी? मराठी आणि हिंदी या दोन्ही देवनागरी असल्या तरी व्याकरण वेगळं आहे. मराठीतील ऱ्हस्व हे हिंदीत दीर्घ आहे. शब्दांमध्येही घोळ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, मराठीत चेष्टा म्हणजे, टवाळी होते. तर हिंदीत चेष्टा म्हणजे, प्रयत्न करणं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचा घोळ होऊ शकतो".
पहिल्या इयत्तेपासून हिंदी सक्तीची नको, हे माझं स्पष्ट मत : मकरंद अनासपुरे
पुढे बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले की, "शिवाय इतक्या लहान वयात काय गरज आहे? असा मला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे पहिल्या इयत्तेपासून हिंदी सक्तीची नको, हे माझं स्पष्ट मत आहे. आम्ही पण पाचवीपासून हिंदी शिकलो. आणि त्यामुळे फारसा फरक पडलेला नाही. मी परदेशात गेलो तरी भाषेमुळे काही भानगड आली अशातला भाग नाही. आपण तेवढ्यापुरतं जुजबी मोडकं तोडकं बोलतो. पण, आपली भाषा ही आपल्याला स्वच्छपणे येणं. आपल्याला ती माहीत असणं. आपल्या भाषेवर आपलं प्रेम असणं, ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते. मी ग्रामीण भाषांमधल्या सिनेमांमध्ये काम केलेलं असलं तरी त्यामध्ये बऱ्याच म्हणींचाही वापर केलेला आहे. वेगवेगळे शब्दही मी त्यामध्ये वापरलेले आहेत. भाषिक सौंदर्यासाठी प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो"
आपण भाषेला मोठं करत नसतो. तर भाषेमुळे आपण मोठे होतो : मकरंद अनासपुरे
"मी कॉस्मोपॉलिटियन सोसायटीमध्ये राहतो. जेव्हा माझा मुलगा म्हणाला की, मी कोशिश केली पण मला जमलं नाही. तेव्हा मी बायकोला सांगितलं. त्यामुळे घरात स्पष्ट मराठी बोललं गेलं पाहिजे. आपल्या भाषेचा अभिमान आपण बाळगलाच पाहिजे. मी सातत्यानं मराठीच बोलतो. मी कोणतीही वेगळी भाषा बोलत नाही. जिथे गरजेचं असतं, तिथे आपल्याला तोडकं मोडकं संवाद साधता येतो. आपण भाषेला मोठं करत नसतो. तर भाषेमुळे आपण मोठे होतो", असं मकरंद अनासपुरे म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























