Mahesh Babu Got ED Notice: साऊथ सुपरस्टार महेश बाबू ED च्या कचाट्यात, तडकाफडकी समन्स जारी; प्रकरण नेमकं काय?
Mahesh Babu Got ED Notice: साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं नोटीस पाठवली आहे आणि त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय.

Mahesh Babu Got ED Notice: साऊथ सुपरस्टार (South Superstar) महेश बाबू (Mahesh Babu) सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट कंपन्यांशी (Real Estate Company) संबंधित मनी लाँड्रिंग (Money Laundering) चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयानं (ED) तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला (Telugu Superstar Mahesh Babu) तडकाफडकी समन्स धाडलं असल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही चौकशी साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुप या दोन रिअल इस्टेट कंपन्यांनी केलेल्या कथित फसवणूक आणि व्यवहारात मोठ्या प्रमाणात असलेल्या अनियमिततेबाबत आहे. ईडीकडून जारी करण्यात आलेल्या समन्समध्ये महेश बाबू यांना 27 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
ईडीनं महेश बाबूला समन्स का धाडलं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश बाबूला डेव्हलपर्सच्या प्रोजेक्ट्सना कथितरित्या एंड्रोस केल्याबाबत आणि कथितरित्या 5.9 कोटी रुपयांचं शुल्काची मागणी केल्याबाबत हे समन्स धाडण्यात आलं आहे. तसेच, या रकमेपैकी 3.4 कोटी रुपये चेकद्वारे देण्यात आले, तर उर्वरित 2.5 कोटी रुपये रोख स्वरूपात देण्यात आल्याचं वृत्त आहे. ही बाब चौकशीतून समोर आली आहे. टीओआयच्या अहवालात असं म्हटलं आहे की, ईडीला संशय आहे की, रोख रक्कम ही समूहाच्या लाँडरिंग फंडचा भाग असू शकते.
साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपविरुद्ध FIR दाखल
तेलंगणा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपवर अनधिकृत लेआउटमध्ये एकच प्लॉट अनेक वेळा विकून आणि बनावट नोंदणी हमी देऊन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकल्पाला अभिनेत्यानं दिलेल्या मान्यतेमुळे लोकांचा विश्वास निर्माण झाला आणि कथित फसवणुकीची माहिती नसलेल्या खरेदीदारांना आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असं मानलं जातं.
दरम्यान, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, सध्या महेश बाबू या घोटाळ्यात प्रत्यक्षरित्या सहभागी असल्याची कोणतीही बाब आढळून आलेली नाही. 100 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचे पुरावे सापडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे, त्यामुळे ईडी फक्त त्याला मिळालेल्या पेमेंटची चौकशी करत आहे.
दरम्यान, कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, महेश बाबू सध्या एसएस राजामौली यांच्यासोबतच्या त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. या चित्रपटात तो ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रासोबत दिसणार आहे. महेश बाबूच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच ईडीकडून आलेल्या समन्समुळे चाहतेसुद्धा हैराण झाले असून हादरुन गेले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















