VIDEO : राजकारणात इतके कॉमेडियन आहेत, तिथे माझी काय गरज आहे? लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिलं होतं भन्नाट उत्तर
Laxmikant Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झालीये.

Laxmikant Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व होते. विनोदी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालण्यात ते यशस्वी ठरले. 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये विनोदी नायकाची भूमिका साकारली. त्यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना अंतःकरणापासून हसवले आणि त्यातूनच ते (Laxmikant Berde) घराघरात पोहोचले. शिवाय हिंदी सिनेमातूनही त्यांना लोकप्रियता मिळाली. दरम्यान, आजही प्रेक्षक त्यांच्या आठवणी विसरलेले नाहीत. दरम्यान, अभिनयासोबत वैयक्तिक आयुष्यात लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी देखील ओळखले जायचे. सध्या त्यांची एका शो मधील जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झालेली पाहायला मिळतेय.
शेखर सुमनच्या Movers & Shakers या शो मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. "तुम्ही हिंदी सिनेमात बरंच काही मिळवलं. मराठी रंगभूमी आणि सिनेमात काम करत राहिलात. तुम्ही कधी असा विचार केला नाही का? की अभिनेता आहोत आता नेता बनूयात.. राजकारणात जावं?" असा प्रश्न शेखर सुमन यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारला होता. यावर प्रत्युत्तर देताना लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले होते की, "राजकारणात इतके कॉमेडियन आहेत, तिथे माझी काय गरज आहे?"
View this post on Instagram
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी झाला होता. त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात रंगभूमीवरून केली आणि पुढे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अशी ही बनवा बनवी, झपाटलेला, धुम धडाका, धडाकेबाज, अफलातून यांसारख्या चित्रपटांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. विशेषतः 'आशीयाना' या चित्रपटात त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले.
मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. ‘हम आपके हैं कौन’, मैने प्यार किया यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका केल्या, ज्या प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. त्यांच्या अभिनयात एक प्रकारची नैसर्गिकता होती. कोणताही संवाद असो वा प्रसंग, त्यांनी त्यात जीव ओतलेला असे. त्यांचा चेहऱ्यावरील हावभाव, संवादफेक हे त्यांच्या यशामागील मुख्य घटक होते.
लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत लोकप्रिय होती. या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. याशिवाय अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची विनोदी जोडी तर मराठी प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच होती. या त्रिकुटाने मराठी सिनेमाला एक वेगळी उंची दिली. त्यांचे विनोदी अभिनय हे केवळ प्रेक्षकांना हसवणारेच नव्हते तर त्यामागे एक सामाजिक संदेशही असायचा.
दुर्दैवाने 16 डिसेंबर 2004 रोजी या महान कलाकाराचं निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली. आजही त्यांचे चित्रपट पाहताना प्रेक्षक हसतात, त्यांची आठवण काढतात आणि त्यांच्या अभिनयाला सलाम करतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचं योगदान केवळ मराठी नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य आहे. त्यांच्या स्मृती आजही मराठी रसिकांच्या मनात ताज्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























