Kiran Mane : 'त्यावेळी' अभिमानाने 'चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण' जात सांगितली, आता ताई हिंदू कशी झाली? केतकी चितळेच्या पोस्टवर किरण मानेंचा सवाल
Kiran Mane : केतकी चितळेच्या पोस्टवर अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी पोस्ट करत सवाल केला आहे.

Kiran Mane : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. त्यातच तिने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे ती चांगलीच चर्चेत आलीये. काही दिवसांपूर्वी केतकीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटो शेअर करत हिंदूराष्ट्राची मागणी केली होती. त्यानंतर आता तिने एक व्हिडिओ शेअर करत महायुतीच्या सरकारवर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. केतकीच्या या व्हिडिओवर आता ठाकरे गटाचे नेते किरण माने यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
राज्य शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या सर्व्हेवेळी केतकीने एक व्हिडिओ टाकला होता. त्यावेळी सर्व्हेसाठी आलेल्या महिला कर्मचारीने जात विचारली असता केतकीने मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण असल्याचं म्हटलं होतं. तोच संदर्भ देत किरण माने यांनी केतकीला सवाल केला आहे.
किरण माने यांचा सवाल काय?
किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहित म्हटलं की, ताईच्या दारात महानगरपालिकेची कर्मचारी भगिनी गेली होती, तेव्हा ताईने तिला जात विचारली होती. ती "मराठा" म्हणाल्यावर तिला तुच्छतेने हिणवताना ताई म्हणाली, "मी 'चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण' आहे", मग ताई आज अचानक 'हिंदु' कशी झाली? किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत केतकीला सवाल केला आहे.
केतकी चितळे नेमकं काय म्हणाली?
केतकीने म्हटले की, देशात मोर्चे काढले जात असून वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी होत आहे. पण तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी दिले आहेत. तुम्हाला आता हिंदू देखील नकोय का, हे ठरवलं आहे का असा सवालही तिने केला. तिघांच्या सरकारमधील एकजण परत काकाकडे जाणार आणि हातापाया पडत मला परत घ्या असे बोलणार. एक जण परत सरकार चालवायला येत नाही म्हणून तीन चाकांची रिक्षा चालवायला जाणार आणि एकजण राजीनामा देतोय पण तो राजीनामा घेतला जात नाही अशी टीकाही तिने केली. तुम्ही विधानसभेत पराभूत व्हायचे आहे असे ठरवले आहे का, असा सवालही केतकीने केला आहे. वक्फ बोर्डाचे बळकटीकरण कशाला करताय असा प्रश्न तिने उपस्थित केला.























