Kiran Mane : 'तू मराठाकार्ड खेळ', मालिकेतून काढलं तेव्हा बड्या नेत्याने दिला होता सल्ला; किरण माने म्हणाले, मला जातीचं...
Kiran Mane : किरण माने यांनी नुकतच त्यांना महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने दिलेल्या सल्ल्याविषयी भाष्य केलं आहे.
Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश करत राजकारणातील इनिंगला सुरुवात केली. त्याआधी किरण माने हे नाव बराच काळ चर्चेत राहिलं होतं. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतून किरण माने यांना काढून टाकण्यात आलं. सोशल मीडियावर केलल्या एका पोस्टमुळे त्यांना बरंच ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. त्यानंतर वाहिनीने त्यांना मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
या सगळ्या परिस्थितीवर किरण माने यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर त्याच काळात त्यांना एका बड्या नेत्याने जातीचं कार्ड वापरण्याचा सल्ला दिला होता, असाही खुलासा यावेळी किरण माने यांनी केला आहे. त्याचप्रमाणे या काळातील अनेक मुद्द्यांवर किरण माने यांनी भाष्य केलं आहे.नुकतच चिन्मय मांडलेकरला झालेल्या ट्रोलिंगनंतर किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्येही या घटनेचा उल्लेख केला होता.
किरण मानेंनी जातीचा आधार घेणं का टाळलं?
किरण मानेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर मटा ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी सविस्तर भाष्य केलं आहे. बड्या नेत्याने दिलेला सल्ला का घ्यावासा वाटला नाही आणि त्या निर्णयाची खंत वाटते का? असा प्रश्न यावेळी किरण माने यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटलं की, 'मला यावर खूप बोलायचं होतं. मी 5 जानेवारीला पंतप्रधान मोदी यांच्यावर एक मिश्किल पोस्ट केली होती. त्यावर मी प्रचंड ट्रोल झालो. पण त्यावेळी त्या ट्रोलर्सनी मोर्चा स्टार प्रवाहच्या पेजवर वळवला. तिथे किरण मानेला मालिकेतून काढून टाका असं सांगण्यात आलं होतं. मी 10 जानेवारीपर्यंत ट्रोल होत होतो आणि 13 जानेवारीला मला फोन आला तू या मालिकेत नाहीस. त्यानंतर महाराष्ट्रातून मला प्रचंड सपोर्ट मिळाला. त्यानंतर वेगवेगळे आरोप होऊ लागले. शरद पवारांनी भेटायला बोलावलं आणि जवळपास दीड तास आम्ही बोलत होतो. त्यावेळी मला एका नेत्याने सल्ला दिला की तू मराठा कार्ड खेळ. तू मराठा आहेस, याचा तुला फायदा होईल. त्यावेळी नुकतेच मराठा मोर्चे झाले होते. मला मुळात मराठा कार्ड हा शब्द आवडत नाही. प्रत्येकाला आपल्या जातीवर प्रेम असतं आणि ते असावं. पण ते मानवतेसाठी असावं. पण जेव्हा मला मराठा कार्ड खेळ असं सांगण्यात आलं तेव्हा मला ते फार कलुशित वाटलं. जेव्हा मी सगळ्या समाजासाठी चांगलं काहीतरी करेन तेव्हा माझ्या समाजाला माझा अभिमान वाटेल. पण या गोष्टीसाठी जर मी ते वापरलं असतं तर जातीय तेढ निर्माण झाला असता जे मला नको होतं.'
चिन्मय ट्रोलिंग प्रकरणाला इतकं महत्त्व द्यावं वाटत नाही - किरण माने
चिन्मयच्या ट्रोलिंगच्या मुद्द्यावर किरण मानेंनी म्हटलं की, 'कोणाचंही ट्रोलिंग होणं हे चुकीचंच आहे. जर तो त्याच्या घरात काय करतोय, तो एखादी राजकीय भूमिका घेतोय. चिन्मयच्या ट्रोलिंग प्रकरणाला इतकं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही.माझ्या आधी जर दुसरा कुणी असता तर त्यानं हा प्रश्न विचारला असता की, माझं ट्रोलिंग झालं तेव्हा तुम्ही कुठं होता? मी तुमच्या टोळक्यातला नव्हतो का? कंपूतला नव्हतो का? की मी तुमच्या जातकुळीतला नव्हतो? माझ्यावर होणारं ट्रोलिंग तुम्ही एन्जॉय केलं. आता चिन्मयवर ट्रोलिंग झालं तेव्हा तुम्ही बोलताय.'