Kedar Dighe : बाळासाहेब हयात असताना आनंद दिघे शिंदेंना 'तो' कानमंत्र देतील का? धर्मवीर-2च्या 'त्या' डायलॉगवरुन केदार दिघेंचा सवाल
Kedar Dighe on Dharmaveer 2 : धर्मवीर-2 सिनेमाच्या ट्रेलरवर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी आक्षेप घेतला आहे.
Kedar Dighe on Dharmaveer 2 : बहुप्रतिक्षित धर्मवीर-2 (Dharmaveer 2) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या ट्रेलरनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सिनेमा सुरु झालाय. कारण या सिनेमातील काही डायलॉगमुळे विरोधकांनी बराच आक्षेप घेतलाय. त्यातच आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी देखील एकनाथ शिंदेना (Eknath Shinde) काही सवाल उपस्थित केले आहेत.
धर्मवीर-2 सिनेमातील अनेक डायलॉगमधून उद्धव ठाकरे आणि मविआ सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. याच संवादावरुन आनंद दिघे यांनी बाळासाहेब हयात असताना आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदेंना असं सांगितलं का असा सवाल उपस्थित केला आहे.
केदार दिघेंनी काय म्हटलं?
केदार दिघे यांनी सिनेमातील संवादावर आक्षेप घेत म्हटलं की, धर्मवीर सिनेमाचा जो ट्रेलर आला आहे, त्यामध्ये डायलॉग आहे. मी जरी तुझ्या हिंदुत्वाच्या मध्ये उद्या मी जरी आलो तरी मला बाजूला सारुन हिंदुत्वाला मिठी मार, हा डायलॉग मला फेक वाटतो. खरंतर तो असा डायलॉग हवा, एकनाथ तू जर माझ्या आणि हिंदुत्वामध्ये आडवा आला तर मी तुला बाजूला सारुन हिंदुत्वाला मिठी मारेन. हा चित्रपट काढणाऱ्यांना दिघेंवर शंका आहे का? की कुठेतरी त्यांच्यावर विश्वास नाही, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, जर असं दिघेंनी शिंदेना 2000 साली सांगितलं असेल तर बाळासाहेबांनी 2009 ला काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला होता त्यावेळी एकनाथ शिंदे कुठे होते? मुळात पक्षाची भूमिका पक्षश्रेष्ठी घेत असतो जी बाळासाहेबांनी घेतली आणि दिघे साहेबांनी घेतली. मग आता दिघे साहेब हिंदुत्वाच्या आड येऊ शकतात असं चित्रपट निर्मात्यांना आणि शिंदेंना म्हणायचं आहे का? 2000 ला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब हयात असताना शिंदेंना दिघे साहेब असं का सांगतील? असाही प्रश्न केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे.
शिंदेंना मान्यच करायचं नाहीये - केदार दिघे
आपल्या पक्षाच्या भूमिका घेण्याचा सर्वाधिकार हा शिवसेना पक्ष नेतृत्वाला असतो, हेच मान्य करायला शिंदे तयार नाहीत. पक्ष नेतृत्वाने घेतलेले निर्णय हे अंतिम असतात ते पक्षाच्या हिताचे असतात हे शिंदेंना मान्य नाही.स्वतःला पक्षापेक्षा, बाळासाहेब ठाकरे,दिघेसाहेब, मातोश्री, उद्धव साहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठे समजायला लागल्यानेच शिंदेंच्या डोक्यात अशा पद्धतीची हवा गेली आहे. आपण केलेली वाईट कृत्ये लपवण्यासाठी चित्रपट काढून प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे, असाही आरोप त्यांनी केलाय.