कंगनाची टिवटिव थांबणार! ट्विटरला रामराम करत 'कू' अॅपवर अकाऊंट उघडणार
कंगनाचे ट्विटरवर 30 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. कंगनाच्या ट्विटर सोडण्याच्या निर्णयामुळे फॉलोअर्सची निराशा होणार आहे.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे कायम चर्चेत असते. असा एकही दिवस नाही, ज्या दिवशी कंगनाने ट्वीटरवर कोणत्या मुद्द्यावर आपले मत मांडले नाही. या ट्वीटचा तिला अनेक वेळा फटका देखील बसला आहे. गेल्या काही दिवसात देशातील प्रत्येक महत्वपूर्ण घटनेवर तिने आपले मत व्यक्त केलंय. यामुळे अनेकदा ती ट्रोलही झाली आहे. परंतु आता कंगनाची ट्विटरवरील ही टिवटिव थांबणार आहे. ट्विटरला रामराम करत असल्याची माहिती स्वत: कंगनाने ट्वीट करत दिली आहे.
कंगना रनौत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाली, "ट्विटर आता तुझा टाईम संपला आहे. आता Koo App वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. मी लवकर कू अॅपवर शिफ्ट होत असून या संदर्भातील माझ् अकाऊंट डिटेल शेअर करेल. स्वदेशी कू अॅपचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे."
Your time is up @Twitter time to shift to #kooapp will inform everyone soon about my account details there. Absolutely thrilled to experience home grown #kooapp https://t.co/Kdm0TISCmR
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 10, 2021
कंगनाचे ट्विटरवर 30 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. कंगनाच्या ट्विटर सोडण्याच्या निर्णयामुळे फॉलोअर्सची निराशा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच तकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहानाने ट्वीट केले होते. रिहानाच्या या ट्वीटवरून कंगनाने निशाणा साधला होता. ट्विटरनं यासंदर्भात आक्षेप घेत कंगनाचे ट्विट डिलिट केले आहेत. तसेच तीच्या वादग्रस्त ट्वीटमुळे 6 बड्या ब्रँड्सकडून कंगनासोबतचे करार रद्द करण्यात आले होते.