दोन पेग घेण्यात काही वाईट नाही, जावेद अख्तर यांच्याकडून दारुची धर्मासोबत तुलना, 'पण लिमिटमध्ये..'
Javed Akhtar : दोन पेग घेण्यात काही वाईट नाही, जावेद अख्तर यांच्याकडून दारुची धर्मासोबत तुलना, 'पण लिमिटमध्ये..'

Javed Akhtar : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) हे त्यांच्या परखड आणि स्पष्ट मतांसाठी ओळखले जातात. कोणताही विषय असो, ते बिनधास्तपणे आपली भूमिका मांडतात. त्यामुळे अनेक वेळा ते ट्रोलर्सच्या निशाण्यावरही येतात. जावेद अख्तर (Javed Akhtar) स्वतः नास्तिक आहेत आणि अनेकदा संघटित धर्माविरोधात बोलताना दिसतात. अलीकडेच त्यांनी (Javed Akhtar) मत व्यक्त करताना धर्माची तुलना दारूशी केली आहे.
धर्म म्हणजे व्हिस्कीसारखा – संयम असेल तर ठीक
'आज तक रेडिओ'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धर्मावर भाष्य करताना सांगितलं की, धर्म आणि दारू या दोन्ही गोष्टी जर संयमात घेतल्या तर चालतात, पण दुर्दैवाने फार कमी लोक त्यांचा जबाबदारीने उपयोग करतात.
"दोन पेग व्हिस्की फायद्याची असू शकते"
जावेद अख्तर म्हणाले, “दिवसाला दोन पेग व्हिस्की हे खरं तर फायद्याचे असू शकतात. पण प्रश्न तिथं येतो जेव्हा लोक दोनवर थांबत नाहीत.” जावेद अख्तर अनेक वर्षांपासून दारूपासून दूर आहेत आणि त्यांनी अनेकदा कबूल केलं आहे की, त्यांनी आपले अनेक वर्ष दारूपायी वाया घालवले.
"दारु आणि धर्मात खूप साम्य आहे"
ते पुढे म्हणाले, "दारु आणि धर्म यांच्यात खूप साम्य आहे. अमेरिकेत एक सर्वे झाला होता – कोण जास्त जगतो: जो मुळात दारू पित नाही किंवा जो रोज एक बाटली संपवतो? तर उत्तर होतं – हे दोघेही फार काळ जगत नाहीत. जे लोक नियमाने, जेवणाआधी दोन पेग घेतात ते जास्त काळ जगतात. औषधांमध्ये दारू असते, मग ती इतकी वाईट कशी असू शकते? वाईट असतो तो अतिरेक."
दूध आणि व्हिस्कीचं उदाहरण
पुढे बोलताना जावेद अख्तर म्हणाले, "एखादा माणूस दोन ग्लास दूध प्यायला तर ठीक वाटतं, पण दोन ग्लास व्हिस्की प्यायली तर तो चुकीचा ठरतो. लोक दूधात अती करत नाहीत, पण व्हिस्की आणि धर्मात करतात. मग ते धोकादायक होतं. काही कॅन्सरच्या पेशी सुरुवातीला वजन कमी करतात, पण नंतर वाढून तुमचं जीवनच संपवतात."
"विश्वास आणि मूर्खपणा यात काय फरक?"
जावेद अख्तर यांनी धर्मांविषयी असलेल्या नाराजीवरही खुलेपणाने बोलताना सांगितलं की, काही वर्षांपूर्वी त्यांची सद्गुरुंसोबत चर्चाही झाली होती. "जे काही तर्क, कारण, पुरावे आणि साक्षांशिवाय आहे, त्यालाच 'विश्वास' म्हणतात. मला खरंच कळत नाही की विश्वास आणि मूर्खपणा यामध्ये फरक तरी काय आहे? कारण मूर्खपणाचीसुद्धा हीच व्याख्या आहे. मी 'विश्वास' मान्य करायला तयार आहे, पण त्यात तर्क हवा."
दारूच्या आठवणी – व्हिस्की ते रम
‘मिड-डे’ला दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी कबूल केलं की, त्यांना व्हिस्की फार आवडायची. पण एकदा त्यांना व्हिस्कीमुळे अॅलर्जी झाली आणि त्यांनी सोडली. मग त्यांनी विचार केला की, आता फक्त बिअर प्यायची. “मी एकाच वेळेस 18 बाटल्या बिअर प्यायचो. मग वाटलं की पोट फुगतंय, म्हणून तीही सोडली आणि रम प्यायला सुरुवात केली.”
"मी आनंदासाठी दारू प्यायचो"
अभिनेता अरबाज खानच्या शोमध्ये जावेद अख्तर यांनी स्पष्ट केलं होतं की, ते दुःख विसरण्यासाठी नव्हे तर आनंदासाठी दारू प्यायचे. “मी दारू फक्त मजेसाठी प्यायचो. यामध्ये मला आनंद मिळायचा, दुःख बुडवण्यासाठी नाही. पण नंतर लक्षात आलं की, मी जर असंच पित राहिलो तर 52-53 व्या वर्षी मरून जाईन. इतकी दारू पिऊन त्याहून अधिक आयुष्य शक्य नव्हतं.” मात्र आता जावेद अख्तर दारूपासून पूर्णपणे दूर झाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























