स्वामींच्या कृपेने नियतीचं नाट्यमय वळण, सावित्रीच्या कथेचा शेवटाकडे जाणारा गुढ प्रवास उलगडणार
मालिकेचे हे भाग नियती, कर्म, पाप, प्रारब्ध आणि चमत्कार यांचा दिव्य संगम दाखवणार असून स्वामींची कथा लीला एका नव्या अध्यायाकडे नेणारी ठरणार आहे.

Jai jai swami Samarth: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका जय जय स्वामी समर्थ मध्ये या आठवड्यात स्वामींच्या दिव्य लीलांनी अक्कलकोटमध्ये नियतीचा थरारक अध्याय साकारला जाणार आहे. सावित्री गौतमवरचा जीवघेणा घाला, भानुदासच्या पापांची पराकाष्ठा आणि स्वामींच्या अद्भुत लीलांनी भरलेले भाग प्रेक्षकांना भावनिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यांवर काहीसा धक्का देणारा आहे.
प्रेक्षक अनुभवणार कधीही न अनुभवलेली स्वामी कृपा
स्वामींकडून बाळप्पाला दिलेला ‘तो दगड’ आणि त्याभोवती घडणाऱ्या चमत्कारिक घटना हा भाग सुरूवातीपासूनच थरारनाट्यमय आहे, अक्कलकोटच्या वेशीवर बाळप्पा स्वामींनी दिलेला दगड घेऊन उभा असताना गावात प्रवेश करणाऱ्या सावित्रीची नजर त्या दगडावर जाते आणि तिला तोच दगड दिसतो जो तिने देव्हाऱ्यात स्वामींची मूर्ती म्हणून पूजेत ठेवलेला आहे. श्रद्धेने भारलेली सावित्री नतमस्तक होते; गौतमलाही दगडावर माथा टेकवायला सांगते. त्याच क्षणी एक अनोळखी हात पुढे येतो आणि सावित्री-गौतम दोघांच्या डोक्यात तोच दगड जोरदार आपटतो; दोघेही जागच्या जागी कोसळतात. दिव्य तेजात स्वामी स्वतः प्रकट होतात आणि बाळप्पा घाबरत विचारतो “स्वामी… ह्या आघातामागेही तुमची लीला आहे?”. ‘आदेश स्वामींचा योग अक्कलकोट दर्शनाचा’ या कथा मालिकेतला गतीमंद गौतम आणि त्याचा सांभाळ करणारी आया सावित्री यांच्या कथेचा हा शेवटाकडे जाणारा गूढ भाग आजवर कधीही न अनुभवलेली स्वामी कृपा प्रेक्षकांना घडवणार आहे.
मालिकेचे हे भाग नियती, कर्म, पाप, प्रारब्ध आणि चमत्कार यांचा दिव्य संगम दाखवणार असून स्वामींची कथा लीला एका नव्या अध्यायाकडे नेणारी ठरणार आहे. जय स्वामी समर्थ आदेश स्वामींचा योग अक्कलकोट दर्शनाचा सोम ते शनी रात्री 8 वाजता फक्त कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.
स्वामी समर्थांवर आधारित मालिकेविषयी
जय जय स्वामी समर्थ ही कलर्स मराठीवर गेल्या 5 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारी ही मालिका 28 डिसेंबर 2020 रोजी प्रदर्शित झाली होती. या मालिकेचे कथानक उमेश नामजोशी दिग्दर्शित आणि कॅमस्क्लब स्टुडिओच्या बॅनरखाली शिरीष लाटकर यांनी लिहिलेले आहे. अक्षय मुदावडकर स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहे.
























