Inspector Manju Lead Actors At Fan's House : श्रियाला भेटून 'इन्स्पेक्टर मंजू'ला अश्रू अनावर, घरी जाऊन चाहतीला दिलं सरप्राईज!
Inspector Manju Lead Actors At Fan's House : ‘सन मराठी’वरील 'इन्स्पेक्टर मंजू' या मालिकेतील कलाकार सत्या आणि मंजू श्रियाला बरं वाटावं म्हणून थेट तिच्या घरी पोहोचून खास सरप्राईज दिलं.

Inspector Manju Lead Actors At Fan's House : 30 सप्टेंबरपासून 'इन्स्पेक्टर मंजू' या मालिकेचं दुसरं पर्व सुरु झालं. पहिल्या पर्वाच्या प्रवासातली चाहत्याच्या प्रेमाची मिळालेली मोठी पोहोचपावती म्हणजे 84 वर्षांचे आजोबा त्यांच्या लाडक्या मंजुला भेटण्यासाठी कोणालाही न सांगता थेट सेटवर पोहोचले. ती आठवण कायम असतानाच आणखी एका चिमुकल्या चाहतीची गोष्ट समोर येतेय.
झालं असं की सत्या-मंजू ही जोडी खरीच आहे असं समजून श्रिया नाईक नावाची एक लहान मुलगी त्यांना भेटण्याचा हट्ट करू लागली. श्रिया ही डाऊन सिंड्रोमने त्रस्त आहे. मालिकेमध्ये मंजूला गोळी लागण्याचा एक प्रसंग नुकताच प्रक्षेपित करण्यात आला. ते पाहिल्यानंतर मात्र श्रियाचा धीर सुटला आणि तिने ताबडतोब साताऱ्याला नेण्याचा हट्ट पालकांकडे केला.
अर्थात श्रियाची प्रकृती आणि इतर कारणांमुळं तिचा हट्ट पूर्ण करणं घरच्यांना शक्य नव्हतं. पण ही गोष्ट जेव्हा सत्या आणि मंजूपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनाही राहावलं नाही आणि या छोट्या चाहतीसाठी ते दोघेही साताऱ्याहून मुंबईला आले.
श्रियाला पाहून अभिनेत्रीची प्रतिक्रिया
चिमुकलीचा मालिकेसाठीचा क्रेझ पाहून अभिनेत्री मोनिका राठी (Monica Rathi) म्हणाली, " मंजूला मिळणार हे प्रेम पाहून मी निशब्द आहे. सातारा ते मुंबई हा प्रवास पहिल्यांदा फार वेगळा होता. कारण आज मी आणि सत्या आमच्या एका फॅनला भेटण्यासाठी मुंबईला आलो आहोत. श्रिया आमच्या मालिकेतील प्रत्येक पात्रावर भरभरून प्रेम करते. प्रत्येक भाग तिने बारकाईने पहिला आहे. ती म्हणाली, "मम्मीसाहेबांना मी चांगलाच धडा शिकवेन."हे वाक्य ऐकून मला धक्का बसला. कारण ती मालिकेत इतकी गुंतली आहे. ती डाऊन सिंड्रोम या आजारात आहे आणि या सगळ्यात ती मंजूला तिची खास मैत्रीण मानते. हे सगळं ऐकून आणि आज प्रत्यक्षात तिला भेटून मी भरून पावले. श्रियाचा हा आनंद असाच रहावा हीच बाप्पाकडे माझी प्रार्थना आहे आणि 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेक्षकांचं हे प्रेम कायम रहावं."
मालिकेच्या माध्यमातून कलाकार घराघरात पोहचतात. प्रेक्षकांशी त्यांचं भावनिक नातं तयार होतं. कलाकार प्रेक्षकांच्या घरातलेच होऊन जातात. श्रियाचं मंजूशी जोडले गेलेले बंध हा त्याचाच एक भाग.
हेही वाचा :


















