(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : हार्दिक-नताशाचा घटस्फोट, चार वर्षांनंतर संसार मोडला; पांड्याची भावनिक पोस्ट
Natasa Stankovic and Hardik Pandya Divorce : क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी घटस्फोट घेतल्याचं सोशल मीडियावर जाहिर केलं आहे.
Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce : भारतीय क्रिकेट संघातील ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) यांचा घटस्फोट झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. हार्दिक आणि नताशाचा चार वर्षांचा संसार अखेर मोडली आहे. हार्दिक आणि नताशामधील सगळ संपल्याची घोषणा त्याने इंस्टाग्राम पोस्टमध्ये केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या कपलमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा होती. आता अखेर या दोघांनी विभक्त झाल्याचं जाहिर केलं आहे.
हार्दिक पांड्याने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
''चार वर्षे सोबत राहिल्यानंतर मी आणि नताशाने आपसी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि आमचे सर्वस्व दिले. वेगळं होणं हे आम्हा दोघांच्या हिताचे असल्याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही एकत्र अनुभवत असलेला आनंद, परस्पर आदर आणि साहचर्य या सर्वांचा आम्ही वेगळं होताना विचार केलाय. आम्ही एक कुटुंब वाढवत असताना हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते.
आमच्या जीवनात आलेला आमचा मुलगा अगस्त्या... आमच्या दोघांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असेल आणि सह-पालक म्हणून आम्ही त्याच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी सर्वस्व देऊ. याक्षणी आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. अशा या अवघड आणि संवेदनशिल काळात आम्हाला प्रायव्हसी मिळावी, आम्हाला सर्वांनी समजून घ्यावी ही विनंती करतो.'' अशी पोस्ट हार्दिक आणि नताशाने शेअर केली आहे.
हार्दिक पांड्याची इंस्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
दोन लग्नाचा घाट, चार वर्षांचा संसार
हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.
हार्दिक पांड्यासाठी 2024 निराशाजनक
2024 मध्ये हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्सकडे आला. मुंबईच्या संघात आल्यानंतर हार्दिक पांड्याला टीमचं नेतृत्त्व देण्यात आलं. यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले. हार्दिक पांड्याला प्रत्येक मैदानांवर प्रेक्षकांच्या शेरेबाजीला सामोरं जावं लागलं. मुंबई इंडियन्सचा संघ देखील चांगली कामगिरी करु शकला नाही. मुंबईची टीम आयपीएलच्या गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहिली. टी20 विश्वचषकात हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी करत विजयात मोलाची भूमिका बजावली. पण तरीही हार्दिक पांड्याला डावलून श्रीलंका दौऱ्यात टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर देण्यात आली. हार्दिक पांड्या आता संघाचा उपकर्णधारही राहिला नाही. एकवेळ टी20 संघात रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून हार्दिक पांड्याकडे पाहिलं जात होतं. पण आज श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या संघामध्ये हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोडा, उपकर्णधारपदही दिलं नाही. त्याशिवाय वनडेमधूनही त्याला वगळण्यात आले आहे.