दुबईत विवाह केलेल्या सोनाली कुलकर्णीच्या पुण्यातील इमारतीत चाहत्याचा शस्त्रासह प्रवेश, सोनालीचे वडील जखमी
नकली बंदूक, घरगुती चाकू, स्प्रे घेऊन आल्याचं समोर आलं. पण हे कशासाठी केलं? यातून त्याला काय साधायचे होते. हे मात्र अद्याप ही अस्पष्ट आहे. सध्यातरी निगडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून, अजयला अटक केलेली आहे.

पिंपरी चिंचवड : सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या एका माथेफिरू चाहत्याने पिंपरी चिंचवडमधील तिच्या राहत्या इमारतीत प्रवेश केला होता. नुकतंच सोनालीने विवाह केलाय, यानंतर 24 वर्षीय अजय शेट्टे हा घायाळ झाला होता. यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिस सूत्राने माहिती दिली. पण सोबत नकली बंदूक, घरगुती चाकू, स्प्रे, नायलॉन दोर तो का घेऊन आला होता? याचा तपास मात्र अद्याप तरी लागू शकलेला नाही. सध्या चोरीचा गुन्हा दाखल आहे.
सोनाली आकुर्डी येथील 'वरलक्ष्मी' या इमारतीत राहते, तिसऱ्या मजल्यावर तिचा फ्लॅट आहे. याच इमारतीत आज सकाळी साडे सात वाजता अजयने गेटवरून चढून प्रवेश केला, पण आतील गेट बंद होते. म्हणून त्याने सांडपाण्याच्या पाईपचा आधार घेतला आणि पहिल्या मजल्यावरील गॅलरीत बसला. त्यांनी गॅलरीचे दार उघडताच तो त्यांच्या घरात घुसला, काही कळेपर्यंत तो त्या घरातून बाहेर पडला. मग तो सोनाली राहत असलेल्या तिसऱ्या मजल्याकडे निघाला. आरडाओरडा सुरू झाल्याने सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे घराबाहेर आले होते. ते स्वतः इथले चेअरमन असल्याने नेमकं काय घडलंय हे त्यांना पहायचं होतं. पण तोवर अजय दारासमोर उभा ठाकला होता. खालून इतर सदस्य आणि सुरक्षा रक्षक वरती आले. हातात बंदूक, चाकू आणि स्प्रे पाहून सगळेच चक्रावले. माझ्या मागे पोलीस लागलेत मला इथंच राहू द्या, असं तो ही शस्त्र दाखवून धमकाऊ लागला. कसबस त्याचं दुर्लक्ष करून त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला, त्याचे वेळी सोनालीच्या वडिलांच्या हाताला चाकू लागला. निगडी पोलिसांना घडला प्रकार सांगताच ते घटनास्थळी आले. जखमी अवस्थेतील अजयला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अजय कोण आहे? तो इथं काय करायला आला होता? ही शस्त्र कुठून आणली? याबाबत निगडी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केली. अजय हा मूळचा बीड जिल्ह्याचा असून तो सध्या पुण्यात मिळेल ते काम करतो. पुढे अजयने इथं येण्या मागचं खरं कारण पोलिसांना सांगितलं. अजयने सोनालीचे गेल्या वर्षीचे काही फोटो सोशल मीडियावर पाहिले होते. यात एक फोटो होता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घंटानाद करण्याच्या आवाहनाला सोनालीने दिलेल्या प्रतिसादाचा. तिने गॅलरीत उभं राहून थाळी वाजवली होती. याच फोटोत ती राहत असलेली 'वरलक्ष्मी' इमारत दिसत होती. इथं सोनालीला भेटायला जायचं असं त्याने ठरवलं होतं. अशात नुकतंच सोनालीने दुबईत विवाह केल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं आणि त्यानंतर अजय आज तिच्या घरापर्यंत पोहचला. सोनालीने विवाह केल्यानेच तो घायाळ झाला आणि त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आता पोलीस हे जबाबात नोंदविण्यात येतं का? हे पहावं लागणार आहे. यासाठी तो हे नकली बंदूक, घरगुती चाकू, स्प्रे घेऊन आल्याचं समोर आलं. पण हे कशासाठी केलं? यातून त्याला काय साधायचे होते. हे मात्र अद्याप ही अस्पष्ट आहे. सध्यातरी निगडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून, अजयला अटक केलेली आहे.























