Suraj Chavan: विजेता झाल्यावर 14 लाखांचं करणार काय? 'झापुक झुपुक' स्टाईलमध्ये सुरज म्हणाला..
सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विनर ठरल्यामुळे त्याला सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत
Big Boss Marathi: गेल्या ७० दिवसात महाराष्ट्रात बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची मोठी चर्चा होती. मित्रांच्या कट्ट्यापासून ते बायकांच्या भिशीपर्यंत सगळीकडे बिगबॉसचा विजेता कोण होणार याचीच उत्सुकता होती. आपल्या झापुक झुपुक स्टाईलनं संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या सुरजनं झगमगाटी दुनियेत स्वत:चं स्थान मिळवलं आणि बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. आपला पॅटर्नच वेगळा असं म्हणत मी ट्रॉफी जिंकणारच अशा आत्मविश्वासानं चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या सुरजनं निक्की तांबोळी, अभिजीत सावंत या स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपदाचा 14.6 लाखांचा धनादेश पटकावला आहे. या पैशांचे तो काय करणार यावर आपल्या झापुक झुपूक स्टाईलनं त्यानं उत्तर दिलंय.
दरम्यान, सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विनर ठरल्यामुळे त्याला सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणसोबत थेट चित्रपट करण्याची घोषणा केली आहे. लवकरच सूरज चव्हाण अभिनेता म्हणून या नव्या चित्रपटात दिसणार आहे.
गुलीगत पॅटर्न…बुक्कीत टेंगूळ!'
बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वात जिंकल्यानंतर सुरज चव्हाणनं माध्यमांशी संवाद साधला. आपल्या झापुक झुपुक स्टाईलमध्ये त्यानं माध्यमांना उत्तर दिलं. तो म्हणाला, 'मी माझ्या सर्व चाहत्यांचे आणि ‘बिग बॉस’चे मनापासून आभार मानतो. मला प्रचंड अभिमान आहे की, मी ‘बिग बॉस’ची ही ट्रॉफी जिंकली. मी आधीच म्हणालो होतो, यंदा ट्रॉफी मीच जिंकणार आणि ही ट्रॉफी ‘झापुक झुपूक’ पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार…ते आज खरं झालं आहे. आपला पॅटर्न एकदम हटके आहे. गुलीगत पॅटर्न…बुक्कीत टेंगूळ!'
जिंकलेल्या पैशांचं सुरज काय करणार?
जिंकलेल्या १४.६ लाखांचं सुरज काय करणार असा प्रश्न त्याला विचारण्यात आला तेंव्हा त्यानं घर बांधणार असल्याचं सांगितलं. तो म्हणाल, मला घर बांधायचंय त्यामुळे ही रक्कम मी घर बांधण्यासाठी वापरणार आहे. त्या घराला म्हणजेच घर बांधून झाल्यावर मी माझ्या घराला ‘बिग बॉस’चं नाव देणार आहे.
View this post on Instagram
सुरज चव्हाण कसा जिंकला?
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये शेवटचे सहा स्पर्धक बाकी होते. हा फिनाले सुरू झाल्यानंतर बिग बॉसने सहाही स्पर्धकांसमोर एक पर्याय ठेवला. एका पेटीत बिग बॉसने 7 लाख रुपये ठेवले होते. ज्या स्पर्धकाला विजेतेपदाच्या शर्यतीतून माघार घ्यायची असेल त्याला हे सात लाख रुपये घेऊन बाहेर पडाण्याचा पर्याय बिग बॉसने दिला होता. बिग बॉसने स्पर्धकांपुढे एका प्रकारचा टास्कच ठेवला होता. मात्र हे सात लाख रुपये कोणीही घेतले नाही.
त्यानंतर बिग बॉसने आणखी दोन लाख रुपये वाढवून ही रक्कम थेट 9 लाख रुपये केली. त्यानंतर रितेशने सहाही स्पर्धकांना स्वखुशीने या स्पर्धेच्या बाहेर पडण्याचा पर्याय दिला. हीच संधी हेरून जान्हवी किल्लेकरने स्पर्धेच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेत 9 लाख रुपये घेतले. त्यानंतर जेतेपदाच्या शर्यतीत पाच स्पर्धक शिल्लक राहिले. म्हणजेच जान्हवी किल्लेकरने स्पर्धेच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन 9 लाख रुपये स्वत:च्या नावावर केले.