Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : ''फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते...''; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेनंतर राज्यात संतापाची एकच लाट उसळली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेनंतर राज्यात संतापाची एकच लाट उसळली आहे. या प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठावण्यात आली आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांनी या घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे. अभिनेते किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. घाईघाईत पोकळ कामं करून, फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते कधी ना कधी उघडे पडतातच असा टोलाही किरण माने यांनी लगावला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 35 फुटी पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी लोकार्पण करण्यात आले. सोमवारी 26 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेता किरण माने याने प्रतापगडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतच किस्सा सांगत विद्यमान सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.
किरण माने यांची पोस्ट काय?
किरण माने यांनी म्हटले की, प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सुंदर, चित्ताकर्षक पुतळा आहे, त्याला येत्या नोव्हेंबर मध्ये सदुसष्ट वर्ष पूर्ण होतील...गेली सात दशकं तब्बल एकशेवीसच्या वेगाने येणारे वारे झेलत हा पुतळा आजही दिमाखात उभा आहे ! या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं भारताचे अत्यंत बुद्धीमान, संवेदनशील, मानवतावादी, देखणे, रुबाबदार पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी! झालं असं की, फलटणचे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना सतत एका गोष्टीची खंत होती की छत्रपतींच्या शौर्याची, पराक्रमाची साक्ष देत उभ्या असलेल्या प्रतापगडावर शिवरायांचं स्मारक नाही ! त्यांनी ही खंत त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलून दाखवली. यशवंतरावांना हे मनोमन पटलं. तातडीने हालचाली करून राजभवनात मिटींग घेऊन प्लॅन ठरला. पं. नेहरूंचीही तात्काळ मान्यता मिळाली. त्यावेळी गडावर जाण्यासाठी रस्ते नव्हते. प्रचंड मेहनत घेऊन, अनेक अडचणींवर मात करून, तब्बल दोन वर्ष युद्धपातळीवर हालचाली करून हे स्मारक उभं राहिलं. पंडितजी स्वत: उद्घाटनाला आले असल्याचे किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
माने यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. आंदोलनं निदर्शनं सुरू होती. त्यावेळचे सत्ताधारी नेते स्मारकाचे उद्घाटन हा प्रचाराचा 'इव्हेन्ट' समजत नव्हते. त्यामुळे ती आंदोलनं राजकीय ठरवत पंडित नेहरुंनी किंवा यशवंतरावांनी दडपली नाहीत. आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला नाही. पंडित नेहरू स्वत:चा मार्ग बदलून कास पठारमार्गे प्रतापगडावर आले, उद्घाटन केलं. नेहरू संवेदनशील होते. कोडगे नव्हते. त्या स्मारकाच्या उद्घाटनाला येताना मोठ्या प्रमाणावर चाललेले आंदोलन पाहून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आग्रहामागची मराठी माणसाची भावना पंडितजींच्या लक्षात आली. त्यामुळं पंडित नेहरूंचं मनपरिवर्तन होऊ लागलं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचं मराठी माणसाचं स्वप्न साकार झालं.
किरण माने यांनी पुढे म्हटले की, छत्रपतींचे खरे विचार अंगी बाणलेले तगडे लोक एकत्र आल्यावर असं चिरकाल टिकणारं शिल्प तर उभं रहातंच... पण काळाच्या कसोटीवर भक्कमपणे उभं राहून झळकणारं देशहिताचं कार्यसुद्धा हातून घडतं ! ..."हे मी केलं, हे मी केलं." सांगण्यासाठी घाईघाईत पोकळ कामं करून, फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते कधी ना कधी उघडे पडतातच. कसोटीच्या काळात आणि काळाच्या कसोटीत तोच टिकतो, असा टोलाही किरण माने यांनी राजकारण्यांना लगावला.