बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार कोण? अक्षय, रणबीर, रणवीर की सलमान यांच्यात चुरस
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यात अनेक मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांचा समावेश आहे.
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड नव्यानं उभं राहू पाहात आहे. गेल्या मार्चपासून बॉलिवूडला लागलेला ब्रेक आता सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. कारण, आता अनेक मोठ्या सिनेमांनी आपआपल्या सिनेमांच्या तारखा ठरवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत येणाऱ्या सिनेमांवर नजर टाकली तर चार मुख्य कलाकारांकडे नजर जाते. यात अक्षयकुमार, रणवीर सिंग, रणबीर कपूर, सलमान खान यांचा समावेश होतो. यात आमीर खानचाही एक सिनेमा आहे.
बॉलिवूड आता नव्या तारखांना येण्यासाठी सज्ज झालं आहे. यात पहिल्यांदा मोठा सिनेमा येतो आहे तो बेलबॉटम. यात अक्षयकुमारची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा येतो आहेच, पण त्याच्यासोबत अक्षयकुमारचे आणखी काही सिनेमे आहेत. शिवाय, इतर कलाकार आणि त्यांचे सिनेमे असे..
अक्षयकुमार
अक्षयकुमारचे अनेक मोठे सिनेमे या वर्षात रिलीज होण्याची शक्यता आहे. यात बेलबॉटम, सूर्यवंशी हे दोन मोठे सिनेमे आहेतच. याशिवाय आणखी काही सिनेमांची नावं ही यात घ्यावी लागतील. त्यात समावेश होतो आतरंगी रे, रक्षाबंधन आणि पृथ्वीराज या सिनेमांचा समावेश होतो. यापैकी पृथ्वीराज या सिनेमाचं चित्रिकरण त्याने नुकतंच पूर्ण केलं. त्याच्या हातात असलेले हे सगळे मोठे सिनेमे मानले जातात.
रणवीर सिंग
अक्षयकुमारच्या खालोखाल आहे अभिनेता रणवीर सिंग. रणवीरचे अनेक महत्वाचे सिनेमे कोरोनामुळे अडकून पडले आहेत. यात महत्वाचा असा 83 हा चित्रपट मानला जातो. भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकावर हा सिनेमा बेतला आहे. यात रणवीर कपील देव यांची भूमिका करतो आहे. या शिवाय रोहित शेट्टीचा सर्कस हा सिनेमाही या वर्षात प्रदर्शनाच्या वाटेवर असणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवही असणार आहे. तर याचा तिसरा चित्रपट आहे, जयेशभाई जोरदार. या सिनेमाची तारीख अद्याप ठरलेली नाही.
सलमान खान
सलमान खानने या लॉकडाऊनमध्ये ओटीटी आणि थिएटर्स असा हायब्रीड रीलीज केलेल्या राधेने फारसा चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा फारसा आवडलेला नाही. सलमानचे वडील सलीम खान यांनाही हा सिनेमा फारसा आवडलेला नाही. आता सलमान पुन्हा एकदा नव्या सिनेामाच्या तयारीत गुंतला आहे. शिवाय त्याचे दोन मोठे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. पैकी एक सिनेमा आहे अंतिम. हा सिनेमा प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न या सिनेमाचा रीमेक आहे. याचं दिग्दर्शन महेश मांजरे करत आहेत. तर दुसरा चित्रपट आहे भाईजान. त्या सिनेमाची मात्र सध्या फारशी चर्चा अद्याप नाही. सलमान यशराज बॅनरचा टायगर 3 करतोय. पण त्याला अद्याप वेळ आहे. तो चित्रपट 2022 मध्ये यायची शक्यता आहे.
रणबीर कपूर
2021 हे वर्षं रणबीर कपूरसाठी महत्वाचं मानलं जाणार आहे. कारण, त्याचे अनेक सिनेमे या वर्षात आणि 2022 च्या मध्याला प्रदर्शित होणार आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा सिनेमा आहे, आलिया भट, अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ब्रह्मास्त्र. तर त्याशिवाय, शमशेरा आणि एनिमल. हे सिनेमे आणि याची तयारी पाहता रणबीर कपूर बॉक्सऑफिसवर इतर कलाकारांना चांगली टक्कर देईल.
शाहरूख खान
शाहरूख खान हा बॉलिवूडचा महत्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे त्याचा कोणता सिनेमा येतोय याकडे अनेकांचं लक्ष असतं. शाहरूख खानचा पठाण प्रदर्शित व्हायची प्रतीक्षा आहे. त्याच्या या सिनेमात त्याच्यासह दीपीका पादुकोणही असणार आहे. शिवाय आता टायगरच्या भूमिकेत सलमान खानही गेस्ट म्हणून असणार आहे. त्यामुळे पठाण या सिनेमाचं वजन वाढवण्याकडे शाहरूख खानचा कल दिसतो.
आमीर खान
गेल्या काही महिन्यांपासून आमीर खान लालसिंग चढ्ढा या सिनेमाच्या तयारीत गुंतला आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच आमीर खानने या सिनेमाचं सगळं चित्रिकरण पूर्ण केलं आहे. लॉकडाऊन काळात या सिनेमाचं बरंचस पोस्ट प्रॉडक्शन संपवलं आहे. आता हा सिनेमा रिलीज होण्याकडे अनेकांचं लक्ष आहे. फॉरेस्ट गम्प या सिनेमाचा रिमेक आहे.