Vikram Gokhale : 'आठवणीतले विक्रम काका'; अमिताभ बच्चन यांनी दिला विक्रम गोखलेंच्या आठवणींना उजाळा
Vikram Gokhale : विक्रम गोखले यांना 'आठवणीतले विक्रम काका' या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
Vikram Gokhale : मुंबईत दिवंगत अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांना 'आठवणीतले विक्रम काका' या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. दरम्यान विक्रम गोखले यांच्याशी जवळीक असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
आठवणींना उजाळा देत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन म्हणाले,"विक्रम गोखले आज या जगात नाहीत या गोष्टीवर विश्वास बसत नाही. काही सिनेमात मला त्यांच्यासोबत काम करता आलं हे मी माझे भाग्य समजतो. एका मराठी सिनेमासाठी त्यांनी मला विचारलं होतं आणि त्या सिनेमाच्या माध्यमातून मला पुन्हा त्यांच्यासोबत वेळ घालवता आला".
सचिन पिळगावकर म्हणाले,"मला विक्रम गोखलेंचं प्रत्येक काम पाहून आनंद होतो पण त्याचवेळी मला खंत वाटते की, आता येणाऱ्या पिढीला त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहता येणार नाही. मी त्यांच्यासोबत काम केलं या गोष्टीचा मला आनंद आहे".
विलेपार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या सावरकर पटांगणावर 'आठवणीतले विक्रम काका' या शीर्षकांतर्गत एका श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. विक्रम गोखले मित्र परिवार, पार्ले महोत्सव परिवार, लोकमान्य सेवा संघ व जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघातर्फे या सभेचे आयोजन करण्यात आले होते. 'आठवणीतले विक्रम काका' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील विक्रम गोखले यांच्याशी जवळीक असणाऱ्या मान्यवरांकडून विक्रमकाकांच्या संस्मरणीय स्मृतीन्ना उजाळा दिला गेला.
विक्रम गोखलेंकडे करिअरच्या सुरुवातीला राहायला घर नव्हते. ते घरत शोध असताना अमिताभ बच्चन यांनी त्यांना मदत केली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या मदतीने महाराष्ट्र सरकारकडून त्यांना सरकारी निवासस्थान मिळाले. दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते.
विक्रम गोखले यांनी पाच दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे. 26 नोव्हेंबर 2022 रोजी वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे अनेक सिनेमे चाहते आजही आवडीने पाहतात.
विक्रम गोखले यांचा 'सूर लागू दे' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
संबंधित बातम्या