Vikram Gokhale : विक्रम गोखले यांना कुटुंबातच मिळाला अभिनयाचा वारसा; आजी-आजोबांनी दिले अभिनयाचे धडे
Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना अभिनयाचे धडे त्यांच्या कुटुंबातच मिळाले होते.
Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. विक्रम गोखले गेली अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांत त्यांनी काम केलं आहे. पण त्यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला आहे.
विक्रम गोखले यांनी मराठी रंगभूमी चांगलीच गाजवली आहे. मराठीसह त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपला दबदबा कायम ठेवला. पण त्यांना अभिनयाचे धडे त्यांच्या कुटुंबातच मिळाले होते. आजीपासून वडिलांपर्यंत कुटुंबातील अनेक मंडळी सिनेसृष्टीत काम करत होते. विक्रम गोखले यांच्या आजी हिंदी सिनेसृष्टीतल्या पहिल्या महिला कलाकार होत्या. त्यांच्या आजीने बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांच्या आजीच्या पहिल्याच सिनेमाचं दिग्दर्शन भारतीय सिनेसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांनी केलं होतं. तसेच त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे देखील मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार होते. त्यांनी 70 हून अधिक मराठी सिनेमांत काम केलं आहे.
विक्रम गोखले यांना 2013 साली 'अनुमती' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच 2015 साली विष्णूदास भावे जीनवगौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. 2017 मध्ये हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, 2018 मध्ये पुलोत्सव सन्मानाने गौरवण्यात आले होते. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारानाही सन्मानित करण्यात आले होते.
विक्रम गोखलेंची शेवटची भूमिका
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'गोदावरी' सिनेमात विक्रम गोखले महत्त्वाच्या भूमिकेत होते. या सिनेमात ते जितेंद्र जोशीच्या आजोबांच्या भूमिकेत होते. हा सिनेमा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. तर 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत त्यांनी नुकतचं काम केलं होतं. या मालिकेतील गुरुंजींची भूमिका अखेरची ठरली.
विक्रम गोखले यांनी मनोरंजनसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. माहेरची साडी सिनेमातील त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचं मोलाचं योगदान आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. विक्रम गोखले यांनी 30 ऑक्टोबरला त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा केला होता. विक्रम गोखले यांच्या अभिनयाला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एबीपी माझाच्या 'सिंहासन' या वेबसीरिजमध्ये ते सूत्रसंचालकाच्या भूमिकेत होते.