Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर; पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु
विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरु आहेत.
विक्रम गोखले यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एबीपी माझाच्या सिंहासन या कार्यक्रमाचे विक्रम गोखले यांनी सूत्रसंचालन केले होते.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम जोशी यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोन यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या कथानकाचे आणि चित्रपटातील कालाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. तसेच 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत देखील त्यांनी एन्ट्री केली होती. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांनी या मालिकेमध्ये काम केले. या मालिकेत त्यांनी पंडीत मुकुल नारायण नारायण ही भूमिका साकारली.
चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमातून प्रेक्षकांचे केले मनोरंजन
विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयानं अनेक रसिकांच्या मनावर छाप सोडली. विक्रम गोखले यांनी रंगभूमीवर एक मोठा काळ गाजवला आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा दबदबा होता. त्यांनी आजवर त्यांच्या नावाप्रमाणेच अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. 30 ऑक्टोबरला विक्रम गोखले यांनी त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा केला.
अकेला, अग्निपध , ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. तसेच या सुखांनो या, अग्निहोत्र, संजीवनी या मालिकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. लोकप्रिय मालिका अग्निहोत्रमध्ये विक्रम गोखले यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री या व्यक्तीरेखनं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव , वजीर हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. विक्रम गोखले यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: