'जुग जुग जियो'च्या शुटिंगदरम्यान अनिल कपूर, वरुण धवन, नीतू सिंह यांना कोरोनाची लागण
आगामी चित्रपट 'जुग जुग जियो'च्या शुटिंग दरम्यान स्टार कास्टला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेता अनिल कपूर, वरुण धवन, अभिनेत्री नीतू सिंह आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : आगामी चित्रपट 'जुग जुग जियो'च्या शुटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर, वरुण धवन, अभिनेत्री नीतू सिंह आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. असं सांगण्यात येत आहे की, स्टार कास्टला कोरोनाची लागण झाल्यामुळे चित्रपटाचं चित्रिकरण थांबवण्यात आलं आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरुण धवन, नीतू सिंह आणि अनिल कपूर यांच्यासोबत दिग्दर्शक राज मेहता यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ज्यानंतर निर्मात्यांनी शुटींग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत चारही सेलिब्रिटी पूर्णपणे ठिक होत नाहीत, तोपर्यंत 'जुग जुग जियो' या चित्रपटाची शुटींग पुन्हा सुरु करण्यात येणार नाही. 'जुग जुग जियो' या चित्रपटात अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन यांच्यासोबत कियारा अडवाणी आणि प्राजक्ता कोळी हे कलाकारही आहेत.
सेलिब्रिटींकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनंतर अनलॉकच्या प्रक्रियेत अटी-शर्तींसह शुटींगसाठी परवानगी देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच नीतू कपूर यांनी चित्रपटांमध्ये कमबॅक केलं आहे. तसेच राज मेहता यांचा चित्रपट 'जुग जुग जियो' ची शुटींग सुरु होती. फिल्मफेयरने दिलेल्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाशी निगडीत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील तीन लीड अॅक्टर्स, वरुण धवन, नीतू सिंह आणि अनिल कपूर यांच्यासह दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, अद्याप या सेलिब्रिटींकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
'जुग जुग जियो' चित्रपटात एक फॅमिली ड्रामा दाखवण्यात येणार आहे. ज्याची निर्मिती करण जोहर करणार आहे. अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर 'जुग जुग जियो' या चित्रपटातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. जर नीतू कपूर यांच्याबाबत बोलायचं झालं तर, त्याचा आगामी चित्रपट 'कुली नं 1' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती वरुण धवनचे वडील डेविड धवन यांनी केली आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत साला अली खान स्क्रिन शेअर करणार आहे.