BJP Chitra Wagh Shiv Sena UBT Election Advt : माझी माफी मागा अन्यथा...; चित्रा वाघ यांनी अॅडल्ट स्टार असल्याचा आरोप केलेल्या अभिनेत्याने दिला इशारा
BJP Chitra Wagh Shiv Sena UBT Election Advt : जाहिरातीमध्ये अॅडल्ट स्टारचा वापर केला असल्याचा आरोप केल्याप्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Ullu Actor Raj Nayani on Chitra Wagh : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shiv Sena UBT) आपल्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर केला असल्याचा आरोप केल्याप्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) अडचणीत येण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी आरोप केलेल्या अभिनेत्याने चित्रा वाघ यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. वाघ यांनी माफी न मागितल्यास आपण कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी (Raj Nayani) यांनी दिला आहे.
अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, मी एक चारित्र्यवान कलावंत आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो हे त्यांना माहीत असावे असेही त्यांनी म्हटले.
चित्रा वाघ यांनी माझा अपमान केला...
राज नयानी यांनी म्हटले की, चित्रा वाघ यांनी माझ्या एका वेब सीरीजमधील भूमिकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा देऊन माझी बदनामी केली असल्याचा आक्षेप घेत असून त्यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मी अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करणार असल्याचेही अभिनेते राज नयानी यांनी म्हटले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीत मी काम केले आहे. त्यामुळे त्या जाहिराती करणारा कलावंत पॉर्न स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला. जे फोटो त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवले ते माझ्या एका वेब सीरिज मधले आहेत आणि ते त्या भूमिकेचा एक भाग होते असेही त्यांनी स्पष्ट केले. चित्रा वाघ यांनी विनाकारण माझ्या प्रतिमेला मलीन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागला आहे. केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी माझी प्रतिमा मलीन केली असल्याचेही त्यांनी म्हटले.
चित्रा वाघ यांनी कोणते आरोप केले?
गुरुवारी, चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाच्या निवडणूक जाहिरातीवर आक्षेप घेतला. या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना ठाकरे गटाला राज्यात पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का असा सवाल केला. चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटातील महिला नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.