'Koozhangal'तमिळ सिनेमा करणार 'Oscars 2022' मध्ये भारताचे प्रतिनिधित्व
Oscars 2022 : काल 'शेरनी' आणि 'सरदार उधम सिंह' शॉर्टलिस्ट झाल्यानंतर आज तमिळ सिनेमा 'कूझंगल' भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे समोर आले आहे.
Oscars 2022 : मनोरंजन क्षेत्रात ऑस्कर पुरस्कार मानाचा मानला जातो. सध्या ऑस्करसाठी भारताकडून सिनेमांची निवड करण्यात येत आहे. काल 'शेरनी' आणि 'सरदार उधम सिंह' शॉर्टलिस्ट झाल्यानंतर आज तमिळ सिनेमा 'कूझंगल' भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे समोर आले आहे. 'कूझंगल' सिनेमाचे दिग्दर्शन पीएस विनोथराज यांनी केले आहे. पीएस विनोथराज यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. त्यांच्या पहिल्याच सिनेमाने सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. विग्रेश शिवन या सिनेमाचे निर्माते आहेत. त्यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑस्करसाठी निवड झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
'कूझंगल' सिनेमाचे कथानक काय आहे ?
'कूझंगल' सिनेमाने याआधी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाव कमावले आहे. या सिनेमाचे कथानक एक दारुडे वडील आणि त्यांचा मुलगा यांच्या नात्यावर भाष्य करतो. त्या मुलाची आई, वडीलांच्या त्रासाला कंटाळून तिच्या आई-वडीलांच्या घरी निघून गेलेली असते. त्यानंतर वडील आणि मुलगा आईला कसे मनवतात यावर सिनेमा भाष्य करतो. नेदरलॅंडमध्ये 4 जानेवारी 2021 ला आयोजित केलेल्या रॉटरलॅंडच्या 50 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात चेल्लापंडी आणि करुथथदैयां मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.
या दिवशी साजरा होणार 'ऑस्कर अॅवॉर्ड'
2021 सालात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा समावेश ऑस्करसाठी केला जात असतो. 27 मार्च 2022 मध्ये लॉस एंजिल्स, कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये प्रेक्षक प्रतिक्षा करत असलेला 'ऑस्कर अॅवॉर्ड' रंगणार आहे. विद्या बालनचा 'शेरनी' सिनेमा प्रदर्शित होऊन अनेक दिवस झाले आहेत. तर विक्की कौशलचा 'सरदार उधम' नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'कूझंगल' सिनेमाने याआधी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाव कमावले आहे. आता ऑस्करमध्ये हे सिनेमे भारताचे नाव मोठे करणार का याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.
'शेरनी', 'सरदार उधम सिंह'चा समावेश
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या यादीत 14 भारतीय सिनेमांचा समावेश आहे. तमिळ सिनेमा मंडेला, मल्याळम चित्रपट नायटू आणि हिंदीतील विद्या बालनचा 'शेरनी' आणि विक्की कौशलचा 'सरदार उधम' सिनेमाचा समावेश आहे. तर चेल्लापंडी आणि करुथथदैयां यांच्या 'कूझंगल' सिनेमाचीदेखील निवड झाली आहे. हे सर्व सिनेमे ॲास्करसाठी भारताच्या प्रवेशिका म्हणून शॅार्टलिस्ट झाले आहेत.
शेरनी
शेरनी या चित्रपटामध्ये विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये विद्या फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचे कथानक मानव आणि प्राणी यांच्यावर अधारित आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला होता.
सरदार उधम सिंह
सरदार उधम सिंह हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मीती शूजीत सरकार यांनी केली आहे. हा चित्रपट सरदार उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. सरदार उधम सिंह यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला होता. विकी कौशलचा अभिनय आणि चित्रपटाचे कथानक या गोष्टींमुळे हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.