(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sulochana Chavan : सुलोचना चव्हाण यांना 'लावणीसम्राज्ञी' हा किताब कसा मिळाला? जाणून घ्या कारकीर्द
Sulochana Chavan : आचार्य अत्रे यांचा 'हीच माझी लक्ष्मी' हा सुलोचना चव्हाण यांचा पहिला मराठी सिनेमा.
Sulochana Chavan : लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांचं आज 10 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. सुलोचना यांनी एका पेक्षा एक ठसकेबाज लावण्या आपल्या आवाजात स्वरबद्ध केल्या आहेत. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गायला सुरुवात केली. हिंदी सिनेसृष्टीत के. सुलोचना म्हणून त्या ओळखल्या जात.
मुंबईतील चाळीत गेलं बालपण...
सुलोचना चव्हाण यांचं माहेरचं नाव सुलोचना कदम असं होतं. त्यांचं बालपण मुंबईतील एका चाळीत गेलं. सर्वसामान्य घरात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. श्रीकृष्ण बाळमेळाव्याच्या माध्यमातून सुलोचना यांचं कलाक्षेत्रात पहिलं पाऊल पडलं. त्यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नव्हते. पण तरीही त्यांनी गायन आत्मसात केलं.
सुलोचना चव्हाण यांनी पहिलं गाणं कोणतं गायलं?
'कृष्ण सुदामा' या सिनेमासाठी सुलोचना चव्हाण यांनी पहिल्यांदा गाणं गायलं. त्यावेळी त्या फक्त नऊ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्यांनी मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर या आघाडीच्या गायकांसोबत गायला सुरुवात केली. मराठीसह हिंदी, गुजराती, भोजपुरी, तमिळ, पंजाबी अशा अनेक भाषांत त्यांनी आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे.
अन् मिळाला 'लावणीसम्राज्ञी' किताब...
आचार्य अत्रे यांचा 'हीच माझी लक्ष्मी' हा सुलोचना चव्हाण यांचा पहिला मराठी सिनेमा. या मराठी सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. त्यानंतर 1952 सली शाम चव्हाण यांच्या 'कलगीतुरा' या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा लावणी गायन केलं. या गाण्याने सुलोचना चव्हाण यांचं आयुष्य बदललं. हंसा वाडकर यांच्यावर चित्रीत झालेली ही लावणी गायल्यानंतर आचार्य अत्रे यांनी सुलोचनाबाईंना 'लावणीसम्राज्ञी' असा किताब दिला.
सुलोचना चव्हाण यांची गाजलेली गाणी (Sulochana Chavan Popular Songs) :
सुलोचना चव्हाण यांची नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, पाडाला पिकलाय आंबा, फड सांभाळ तुऱ्याला गं, खेळताना रंगबाई होळीचा होळीचा, कसं काय पाटील बरं हाय का, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, मला म्हणत्यात पुण्याची मैना, बाई मी मुलखाची लाजरी अशी अनेक गाणी गाजली आहेत.
सुलोचना चव्हाण यांना मिळालेले पुरस्कार :
सुलोचना चव्हाण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे राम कदम पुरस्कार, 'मल्हारी मार्तंड’साठी मिळालेला सर्वोत्कृष्ट लावणी गायिकेचा सन्मान, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.
मुंबईतील गिरगाव फणसवाडीमधील लीला तारा इमारत या त्यांच्या राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
संबंधित बातम्या