Jiah khan : 'सूरज माझ्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता'; जिया खानच्या आईनं न्यायालयात दिली माहिती
Jiah khan : जिया खानच्या (Jiah khan) आईनं बुधवारी (17 ऑगस्ट) न्यायालयात सांगितले की, अभिनेता सूरज पांचोली हा जियावर शारीरिक आणि मानसिक छळ करत होता.
Jiah khan : 2013 मध्ये मुंबई येथे स्वत:च आयुष्य संपवणाऱ्या अभिनेत्री जिया खानच्या (Jiah khan) आईनं बुधवारी (17 ऑगस्ट) न्यायालयात सांगितले की, अभिनेता सूरज पांचोली हा 2012 मध्ये जियावर शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. रिपोर्टनुसार, जिया खान आणि सूरज पांचोली यांचे अफेअर होते. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सूरजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या प्रकरणाचा तपास करत आहे. सूरज पांचोली हा सध्या जामिनावर बाहेर आहे.
काय म्हणाली जियाची आई?
बुधवारी (17 ऑगस्ट) जिया खानची आई राबिया खान यांनी न्यायाधीश एएस सय्यद यांच्यासमोर या प्रकरणात साक्ष नोंदवली. राबिया खान यांनी कोर्टाला जियाची बॉलीवूडमधील एन्ट्री, तिची कारकीर्द, आणि सूरज पांचोलीसोबतचे नाते याबद्दल सांगितले. त्यांनी सांगितलं, सूरज पांचोलीनं जिया खानशी सोशल मीडिया साइटद्वारे संपर्क साधला आणि त्याने तिला भेटण्यासाठी दबाव आणला. जिया सुरूवातीला सूरजला भेटण्यासाठी अनिच्छुक आणि साशंक होती पण सप्टेंबर 2012 मध्ये ते दोघे एकमेकांना भेटले.
राबिया खान यांनी न्यायालयात सांगितले, ऑक्टोबर 2012 पासून सूरज आणि जिया यांनी एकमेकांसोबत राहण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये जिया लंडनमध्ये तिच्या घरी पोहोचली तेव्हा ती आनंदी दिसत होती. राबिया खान यांनी पुढे न्यायालयाला सांगितले की, त्यानंतर जिया कामासाठी मुंबईला परतली. ती ख्रिसमस साजरा करण्यासाठी लंडनला परत येणार होती, पण ती तिथे आली नाही. 24 डिसेंबर 2012 रोजी जियाला सूरज पांचोलीचा मेसेज आला होता की, मित्राशी भांडण झाल्यावर तो जियावर रागावला. तेव्हा मला कळालं की दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर जियानं सूरजला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला. सूरज हा जियाला त्याच्या मित्रांसमोर कमी लेखत होता. जिया त्याच्यासोबत असताना देखील तो दुसऱ्या महिलांसोबत फ्लर्ट करत होता. जिया 14 फेब्रुवारी 2013 रोजी अचानक लंडनला आली. तेव्हा ती खूप उदास दिसत होती.'
राबिया खान म्हणाल्या, 'जियानं सांगितले की, सूरज हा तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करायचा आणि तिला 'अभद्र नावाने' हाक मारायचा. राबिया खान या आज पुन्हा (१८ ऑगस्ट) साक्ष नोंदवणार आहेत. 'निशब्द' या हिंदी चित्रपटातील अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली जिया खाननं 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या राहत्या घरी फाशी घेऊन जीवन संपवलं.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: