Sonu Nigam : सोनू निगम वडापाव खातोय की गातोय? लवकरच नवं गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रसाद ओकची रुचकर पाककृती
Prasad Oak Movie : प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sonu Nigam Song Prasad Oak Vadapav Movie : प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित 'वडापाव' (Vadapav) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam) या सिनेमातील गाणं गाणार आहे. सोनूचा 'वडापाव' खातानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला 'वडापाव' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचं नाव 'वडापाव' असल्यामुळे प्रदर्शनाआधीच तो चर्चेत आला आहे. या सिनेमातील गाणं लोकप्रिय गायक सोनू निगमने गायलं आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'वडापाव'
प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' सिनेमात सविता प्रभुणे,गौरी नलावडे,अभिनय बेर्डे,रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर,शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.
प्रसाद ओकच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या आतापर्यंतच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना कुटुंब आणि त्यातील नात्यांचा गोडवा नेहमीच अनुभवण्यास दिला. त्यामुळे अर्थातच प्रसाद ओकच्या आगामी 'वडापाव' चित्रपटाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.
View this post on Instagram
प्रसाद ओकने 'वडापाव' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सोनू निगम वडापाव खाताना दिसत आहे. तसेच या पोस्टरवर लिहिलेलं आहे की,"सोनू निगम वडापाव खातोय की वडापाव गातोय? प्रसाद ओकची रुचकर पाककृती". पोस्टर शेअर करत प्रसादने लिहिलं आहे,"सोनूजींनी वडापाववर मारला ताव..वडापावसाठी गाताना...लवकरच आम्ही घेऊन येत आहोत एक गोड गाणं सोनूजींच्या मखमली आवाजात..आमचा आगामी सिनेमा 'वडापाव".
बी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट अंतर्गत 'वडापाव' या सिनेमाची निर्मिती करण्यात आलं आहे. या चित्रपटाचे लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. तसंच,चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांच्याकडे आहे.संगीतकार कुणाल करण 'वडापाव' या आगामी चित्रपटाचे संगीतकार आहेत तर मंदार चोळकर हे गीतकार आहेत. तेव्हा तयार रहा घमघमीत वडापावची झणझणीत चव अनुभवायला.
संबंधित बातम्या