Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीच्या आई-बाबांचं सिनेसृष्टीत पदार्पण; 'या' सिनेमात झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत
Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.
Sonali Kulkarni Movie Short And Sweet : अनेक दर्जेदार, विविध धाटणीचे, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे मराठी सिनेमे (Marathi Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे (Sonali Kulkarni) आई-बाबा सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे या नव्या कलाकारांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
'शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये झळकणार सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा
प्रेक्षक सध्या गणेश कदम (Ganesh Kadam) दिग्दर्शित ‘शॅार्ट अॅण्ड स्वीट’ (Short And Sweet) या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), हर्षद अतकरी (Harshad Atkari), श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका असून यात आणखीही दोन नवोदित कलाकार झळकणार आहे. नवोदित कलाकार हे सोनाली कुलकर्णीचे आई - बाबा आहेत.
View this post on Instagram
पुण्यात चित्रीकरण असल्याने सोनालीचे आई-बाबा तिला सहजच सेटवर भेटायला गेले होते. त्यावेळी बसमधील प्रवास करतानाचा सीन चित्रीत होत होता. सोनालीचे आई-बाबा तिथेच असल्याने दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिली. दिग्दर्शकांनी दिलेल्या संधीला मान देत त्यांनीही अभिनय करण्याची संधी स्विकारली. या सिनेमात ते सहप्रवाशाच्या भूमिकेत झळकणार आहेत. आपल्या मुलीसोबत काम करण्याचा आनंद काही औरच आहे, अशा शब्दांत सोनलीच्या आई-बाबांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तर सोनालीलाही आपल्या आईबाबांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल असल्याचे म्हटले आहे.
'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'शॉर्ट अॅण्ड स्वीट'
'शॉर्ट अॅण्ड स्वीट' हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सोनालीने या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्या पोस्टरवर लिहिलं आहे,"या जगात आपली खरी ताकद आणि खरी ओळख आपले कुटुंब आहे, जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक कठीण परिस्थितीशी लढण्याची, सामोरे जाण्याची शक्ती देते". 'शॉर्ट अॅण्ड स्वीट' या कौटुंबिक सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिलं आहे,"सहकुटुंब, सहपरिवार एकत्र आनंद घ्या या गोड सरप्राईजचा 'शॉर्ट ॲण्ड स्वीट' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला".
संबंधित बातम्या