(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'चालबाज' सिनेमाच्या रिमेकमध्ये श्रद्धा कपूर इन आलिया भट आऊट
सिनेमात श्रीदेवी यांनी केलेल्या भूमिकेसाठी आलिया भटचं नाव होतं. पण आता ते नाव मागे पडलं आहे. कारण त्या ऐवजी आता श्रद्धा कपूर चालबाजमधली भूमिका साकारणार आहे.
मुंबई : सध्या नव्या दमाच्या नायिकांची चर्चा जेव्हाकेव्हा होते तेव्हा दोन नावं सातत्यानं येतात. ती असतात आलिया भट आणि श्रद्धा कपूर. आता यात बाकीच्या नायिकांची नावंही आहेत. अगदीच उदाहरणादाखल द्यायचं तर तापसी पन्नू, जान्हवी कपूर, सारा अली खान अशी अनेक नावं आहेत. पण अभिनयाच्या बाबतीत चांगले रोल घेण्यासाठी या दोन नायिका धडपडत असतात. त्यातच आता नव्या आलेल्या वृत्तानुसार आलियाच्या पदरी पडता पडता एक मोठा सिनेमा श्रद्धाच्या खिशात गेला आहे. अर्थात असं होतंच असतं. पण हा सिनेमा मोठा आहे. वेगळा आहे, त्यामुळे या सिनेमात नायिकेचा रोल कोण करणार याकडे अनेकांचं लक्ष होतं.
काही दिवसांपूर्वी एका मोठ्या हिंदी सिनेमाची घोषणा झाली. हा सिनेमा मोठा अशासाठी होता, कारण तो एक रिमेक होता. आणि पूर्वी हा सिनेमा जेव्हा आला तेव्हा त्यातल्या नायिकेच्या भूमिकेसाठी त्यावेळच्या नायिकेला भरपूर शाबासकी मिळाली होती. त्या सिनेमाचं नाव होतं चालबाज. आणि ती नायिका होती श्रीदेवी. आता या चालबाज सिनेमाचा रिमेक करण्याची चर्चा अनेक दिवस सुरू आहे. निर्माते मनमोहन शेट्टी यांनी काही काळापूर्वी या सिनेमाचा आपण रिमेक करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर या सिनेमात श्रीदेवी यांनी केलेल्या भूमिकेसाठी आलिया भटचं नाव होतं. पण आता ते नाव मागे पडलं आहे. कारण त्या ऐवजी आता श्रद्धा कपूर चालबाजमधली भूमिका साकारणार आहे.
दिग्दर्शक पंकज पराशर यांनीही श्रद्धाच्या नावाचा उल्लेख केला आहे. या सिनेमाचं चित्रिकरण लंडनमध्ये होणार आहे. सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. पण या नव्या सिनेमात चालबाज हे नाव असणार आहेच. श्रीदेवी यांनी केलेल्या भूमिकेसाठी सध्या श्रद्धाचं नाव निश्चित झाल्यानं तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता इतर कलाकार या सिनेमात कोण असतील ते कळायला मार्ग नाही. इतकंच नव्हे, तर हा नवा सिनेमा चालबाजची कॉपी असणार नाही. बदलत्या काळानुसार त्यातल्या कथानकात काही बदल केले जाणार आहेत. ते बदल काय आहेत ते यथावकाश कळेल. हा सिनेमा बिग बजेट असणार आहे. म्हणून या सिनेमासाठी भूषण कुमार, क्रिशन कुमार यांनी निर्माते असण्याला मंजुरी दिली आहे.