(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Thakare Exclusive : माझा लेकच 'Bigg Boss 16' जिंकणार; शिव ठाकरेच्या आईने व्यक्त केला विश्वास
Shiv Thakare : शिव ठाकरेची खेळी चाहत्यांच्या पसंतीस येत असून तो या पर्वाचा विजेता होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Shiv Thakare Family On Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) ग्रॅंड फिनालेला फक्त दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे या पर्वात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या पर्वाचा शिव ठाकरे (Shiv Thakare) विजेता होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेची आई म्हणाली, "माझा लेक शिव ठाकरे 'बिग बॉस 16' जिंकणार आणि अमरावतीत ट्रॉफी घेऊन येणार."
शिवची आई म्हणाली की, "शिव ठाकरे 'बिग बॉस 16' सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणे खेळतो आहे. प्रेम आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर तो घरातील इतर सदस्यांना देखील साथ देत आहे. शिवला शालेय वयापासूनच नृत्याची प्रचंड आवड आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतला आहे. स्वत:ची डान्स अॅकेडमी सुरु करुन त्याने मुंबई, दुबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी डान्सच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. प्रत्येक ठिकाणी त्याने पहिला क्रमांकच पटकावला आहे. आतापर्यंत आमचे ट्रॉफीने फक्त दोन शोकेस भरले आहेत. पण 'बिग बॉस 16'च्या ट्रॉफीसाठी अजूनही एका शोकेसमध्ये जागा आहे."
शिवची आई पुढे म्हणाली की, "शिव ठाकरेच 'बिग बॉस 16' जिंकणार आणि अमरावतीत ट्रॉफी घेऊन येणार, याची माला खात्री आहे. अमरावतीसह त्याला संपूर्ण महाराष्ट्राची साथ मिळत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मी विनंती करते की त्याला भरभरुन वोट करा आणि जिंकवा".
मला माझ्या भावाचा खूप अभिमान आहे : शिवचा भाऊ
शिवचा भाऊ म्हणाला की, "शिव ठाकरेचा मी भाऊ आहे याचा मला अभिमान आहे. जो जसा घरी आमच्यासोबत वागतो तसचं तो 'बिग बॉस'च्या घरात देखील वागतो आहे. त्याच्या याच खरेपणामुळे तो आज इथपर्यंत पोहोचला आहे. शिवचा मोठा चाहतावर्ग असून शिव बिग बॉस 16 जिंकावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. त्यामुळे शिवच जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे."
शिव ठाकरे जिंकणार 'बिग बॉस 16'?
'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेने हिंदी 'बिग बॉस'मध्ये देखील आपल्या खेळीने सर्वांना थक्क केलं आहे. शिवचा मोठा चाहतावर्ग असून ते शिव जिंकावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. कोण माऊथ पब्लिसिटी करत आहे, मोठ-मोठ्या बॅनरच्या माध्यमातून महाराष्ट्राची शान असलेल्या शिवला वोट करण्यासाठी सांगितलं जात आहे, चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आता 'आपला माणूस' शिव ठाकरे 'बिग बॉस 16' जिंकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या