Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंच्या लेकाचं मनोरंजनसृष्टीत पदार्पण; 'या' सिनेमाच्या माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंच्या लेकाने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. शरद पोंक्षे - स्नेह पोंक्षे लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Sharad Ponkshe : शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) मराठी कलाक्षेत्रातील एक दिग्गज नाव. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिला आहे. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा पुत्र म्हणजेच स्नेह पोंक्षे (Sneha Ponkshe) करणार आहे. सध्यातरी या चित्रपटाचे नाव ठरलेले नसले तरी या चित्रपटाच्या निमित्ताने वडिल-मुलाची जोडी मात्र एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाच्या टीमने प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन चित्रपटाचा शुभारंभ केला.
वि. एस. प्रोडक्शन्स व मोरया प्रोडक्शन यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची पूर्व तयारी सध्या ‘प्रॅाडक्शन नं 1’ या नावाने होत असून रोहिणी विजयसिंह पटवर्धन या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर शरद पोंक्षे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन स्नेह पोंक्षे याने केले आहे. ही जोडी नक्की कोणत्या विषयावर चित्रपट घेऊन आपल्या समोर येणार आहेत, हे फार औत्सुक्याचे ठरणार आहे.
शरद पोंक्षेंची नवी भूमिका
शरद पोंक्षे म्हणतात,"एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मुलाच्या सोबतीने ही वेगळी भूमिका साकारत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षं सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मला खात्री आहे, तो ही जबाबदारी उत्तमरित्या पेलेल."
दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो,"लवकरच हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. आम्ही सुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत. चित्रीकरणाला सुरूवात होणार असून विषय, शीर्षक, कलाकार हे लवकरच आम्ही जाहीर करू. पदार्पणातच वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा विशेष आनंद आहे."
शरद पोंक्षे यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. त्यानंतर त्यांनी अभिनयासह व्याख्याने द्यायला सुरुवात केली. 'सावरकर' हा त्यांच्या व्याख्यानांचा विषय आहे. आजही अनेक ठिकाणी ते 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या विषयावर व्याख्याने देतात. शरद पोंक्षे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अभिनयाच्या जोरावर शरद पोंक्षे आज घराघरांत पोहोचले आहेत.
शरद पोंक्षे यांचा सिनेप्रवास...
शरद पोंक्षे 2012 मध्ये जितेंद्र जोशीच्या 'तुकाराम' या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसले होते. त्यांनी समर्थपणे पेललेली ही भूमिका चांगलीच गाजली. हे राम, 88 अंटोप हिल, आखरी, ख्वाहिश, ब्लॅक फ्राइ डे, ओटी कृष्णामाईची, एक पल प्यार का, गाढवाचं लग्न, तूच खरी घरची लक्ष्मी, गोळाबेरीज, तुकाराम, देख तमाशा देख, संदूक अशा अनेक हिंदी-मराठी सिनेमांत शरद पोंक्षे महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. त्यांच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे.
संबंधित बातम्या