Sharad Ponkshe : "मी ब्राह्मण आहे, माझ्या घरीदेखील नगरपालिकावाले आले होते"; जात सर्वेक्षणाबद्दल शरद पोंक्षेंचं वक्तव्य चर्चेत
Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे यांनी जात सर्वेक्षणासंदर्भात केलेलं वक्तव्य सध्या चांगलच चर्चेत आहे.
Sharad Ponkshe : अभिनेता पुष्कर जोगने (Pushkar Jog) जात सर्वेक्षण करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली. अभिनेता अभिजीत केळकरने (Abhijeet Kelkar) खास पत्र लिहित आपला संताप व्यक्त केला. अशातच आता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनीदेखील जात सर्वेक्षणाबाबत आपलं मत मांडलं आहे.
शरद पोंक्षे काय म्हणाले? (Sharad Ponkshe comment on Caste Survey Issue)
अभिजीत केळकरच्या पोस्टवर शरद पोंक्षे यांनी कमेंट करत आपलं मत मांडलं आहे. त्यांनी लिहिलं आहे,"माझ्या घरीदेखील नगरपालिकावाले आले होते. मी त्यांना चहापाणी विचारलं व मी ब्राह्मण आहे मला कसलीच सवलत नको म्हणून नोंदही नको, असं नम्रपणे सांगितलं. त्यावर हसून ते निघून गेले. दरवाजावर कोणीही आलं तरी त्याचा आदर करणं ही संस्कृती आहे आपली. नकार सुद्धा नम्रपणे देता येतो".
शरद पोंक्षेंच्या कमेंटला उत्तर देत अभिजीत केळकरने लिहिलं आहे,"आपल्याला सवलत हवी की नको हे आपण ठरवू शकतोच की.. आता चला यांना आरक्षण मिळालं. आता आपल्या मुलांनी शिकायलाच हवं, चांगले गूण मिळवायलाच हवेत वगैरे गळे काढण्याचीही गरज नाही. कारण शिक्षण हे ज्ञान म्हणून घ्यावं, सरकारी नोकरीसाठी नाही. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाहीच ते प्रत्येकाने घ्यायलाच हवं हे अगदी फुले, कर्वे, बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं आहे".
पुष्कर जोगची पोस्ट काय होती? (Pushkar Jog Post)
पुष्कर जोगने पोस्ट लिहिली आहे,"बीएमसीच्या काही कर्मचारी माझ्या घरी आल्या आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. ते जर बाईमाणूस नसते तर दोन लात नक्कीच मारल्या असत्या. कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका. नाहीतर जोग बोलणार नाहीत. डायरेक्ट कानाखाली मारतील".
पुष्करने मागितलेली माफी
पुष्करला त्याच्या वक्तव्यानंतर चांगलच ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा एक पोस्ट शेअर करत त्याने दिलगिरी व्यक्त केली. त्याने लिहिलं होतं,"मी केलेल्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी".
संबंधित बातम्या