Sharad Ponkshe : स्वातंत्र्यदिनी शरद पोंक्षेंची मोठी घोषणा; प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचे पुन्हा प्रयोग करणार
Sharad Ponkshe On Me Nathuram Godse Boltoy : शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असल्याची घोषणा केली आहे.
Sharad Ponkshe On Me Nathuram Godse Boltoy Drama : अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या चर्चेत आहेत. शरद पोंक्षे यांचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय' (Me Nathuram Godse Boltoy) हे नाटक चांगलच गाजलं. एकीकडे हे नाटक गाजत असताना दुसरीकडे या नाटकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पण आता पुन्हा या नाटकाचे प्रयोग करण्याचा निर्णय शरद पोंक्षेंनी घेतला आहे.
शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असल्याची घोषणा केली आहे. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकात शरद पोंक्षेंनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. 1997 मध्ये हे नाटक रंगभूमीवर आलं. सहा वर्षांपूर्वी या नाटकाचे प्रयोग थांबवण्यात आले.
शरद पोंक्षेंनी व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
शरद पोंक्षेंनी 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाची घोषणा करत लिहिलं आहे,"नमस्कार... आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला आज एक अतिशय आनंदाची बातमी देणार आहे. मी 11 मार्च 2018 ला 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचा शेवटचा प्रयोग केला. त्यानंतर जाहीर केलं की, मी यापुढे रंगभूमीवर नथुरामच्या भूमिकेत कधीही दिसणार नाही. मी त्या शब्दाशी प्रामाणिक राहिलो. गेली साडेपाच वर्षे मी हे नाटक केलं नाही.पण गेली पाच वर्ष महाराष्ट्रात व्याख्यानाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकांनी मला या नाटकाचे प्रयोग करा, असे सांगितले. आमच्या पुढच्या पिढ्यांना हे नाटक पाहायचं आहे, थोडे तरी प्रयोग करा, असे वारंवार लोक मला सांगत होते".
View this post on Instagram
शरद पोंक्षे पुढे म्हणाले,"त्यानंतर मग मी विचार केला की, एकंदरीत माझं वय आणि नथुराम गोडसेचं वय लक्षात घेता आता जर मी हे नाटक केलं नाही तर अजून चार-पाच वर्षांनी मला ते करता येणार नाही. त्यामुळेच मग मी फक्त 50 प्रयोगांसाठी 'नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक करण्याचा निर्णय घेतलाय. ऑक्टोबर 2023 संपूर्ण महाराष्ट्रात मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे प्रयोग करणार आहे".
शरद पोंक्षे यांचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचं लेखन प्रदीप दळवी (Pradeep Dalvi) यांनी केलं आहे. तर विनय आपटे (Vinay Apte) यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 1997 मध्ये या नाटकाला विरोध झाल्यानंतर 817 व्या प्रयोगानंतर हे नाटक बंद करण्यात आलं होतं. शरद पोंक्षे यांच्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकासह त्यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या