(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sambhajiraje Chhatrapati: 'चित्रपटांतून इतिहासाची मोडतोड, असे सिनेमे काढाल तर माझ्याशी गाठ'; संभाजीराजे छत्रपती आक्रमक
संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) हे काही चित्रपट निर्मात्यांवर आक्रमक झाले. हर हर महादेव आणि वेडात दौडले सात या दोन चित्रपटांवर संभाजीराजे छत्रपती यांनी अक्षेप घेतला आहे.
Sambhaji Raje: ऐतिसासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात आहे तसेच या चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे, असा आरोप नुकताच संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी काही ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मात्यांवर केला आहे. नुकत्याच एका पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे छत्रपती हे काही चित्रपट निर्मात्यांवर आक्रमक झाले. हर हर महादेव आणि वेडात दौडले सात या दोन चित्रपटांवर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे.
इतिहासाची मोड तोड केली तर गाठ माझ्याशी आहे: संभाजीराजे छत्रपती
'हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. हे असे चित्रपट आपण लोकांपुढे घेऊन जायचे? सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं, आपल्याला आधिकार दिले आहेत, म्हणून आपण चित्रपटात काही पण दाखवाचं? सिनेमॅटिक लिबर्टी असली तरी इतिहासाचा गाभा सोडून कसे काय हे लोक चित्रपटाची निर्मिती करत आहेत?' असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
'चित्रपटांच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना मी सांगू इच्छितो, जर अशा चित्रपटांची निर्मिती केली तर गाठ माझ्याशी आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आपण वाचत नाही, ही आपली देखील चुक आहे. त्यामुळे हे लोक इतिहासाची मोड तोड करुन आपल्या समोर मांडतात. माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे की, सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी. ' अशी मागणी यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
"वेडात मराठे वीर दौडले सात" चित्रपटावर साधला निशाणा
"वेडात मराठे वीर दौडले सात" या चित्रपटातील कलाकांचा एक फोटो दाखवत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'हे मावळ्यांचे पोषाख पाहा. हे काय मावळे आहेत का?' मी दौऱ्यामध्ये होतो त्यामुळे मी अजून हा चित्रपट बघितले नाहीत पण माझी भूमिका स्पष्ट आहे. चांगले चित्रपट केले तर मी स्वतः दिग्दर्शक यांना कौतुकाची थाप देईल. पण इतिहासाची मोड तोड केली तर गाठ माझ्याशी आहे.'
हर हर महादेव हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. तर "वेडात मराठे वीर दौडले सात" या चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. तर या चित्रपटात प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम आणि अक्षय कुमार हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.