Saawan Kumar Tak : ‘अलविदा’ सावन कुमार टाक! सलमान खान ते राकेश रोशन, बॉलिवूड दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
Saawan Kumar Tak Passes Away : चित्रपट निर्माते आणि गीतकार सावन कुमार टाक (Saawan Kumar Tak) यांचे गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले.
Saawan Kumar Tak Passes Away : चित्रपट निर्माते आणि गीतकार सावन कुमार टाक (Saawan Kumar Tak) यांचे गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सावन कुमार टाक यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसातील संसर्ग आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत होता. त्यांच्यावर मुंबईतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
‘हृदयविकाराच्या झटक्याने दुपारी 4:15 वाजता सावन कुमार टाक यांचे निधन झाले’, अशी माहिती सावन कुमार टाक (Saawan Kumar Tak) पुतणे नवीन टाक यांनी माध्यमांना दिली. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी सावन कुमार टाक यांना श्रद्धांजली वाहिली.
तुमच्याबद्दल नेहमी मनात आदर राहील : सलमान खान
दिवंगत निर्माते सावन कुमार टाक यांच्या ‘सनम बेवफा’ आणि ‘सावन’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) झळकला होता. सलमान खान याने ट्विटरद्वारे सावन कुमार टाक यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने ट्विट करत म्हटले की, ‘प्रिय सावनजी तुमच्या आत्म्यास शांती लाभो. तुमच्याबद्दल मनात नेहमी आदर आणि प्रेम राहील.’
त्यांच्यामुळे आम्हाला सुंदर गाणी मिळाली : अनिल कपूर
अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी देखील थ्रोबॅक फोटो पोस्ट करत त्यांच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी लिहिले की, ‘सावन कुमार यांच्या निधनाबद्दल ऐकून खरंच दुःख झाले. सदैव आनंदी असणाऱ्या सावनजींना संगीताची उत्तम जाण होती. त्यांच्यामुळे आम्हाला काही सुंदर गाणी मिळाली. मला त्यांची नेहमीच आठवण येईल RIP सावन जी.’
सावनजी आयुष्याचा समुद्र पार करून निघून गेले : पद्मिनी कोल्हापुरे
सावन कुमार टाक यांच्यासोबत ‘सौतन’ आणि ‘साजन बिना सुहागन’ यांसारख्या चित्रपट काम केलेल्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांनी देखील एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, ‘जिंदगी गम का सागर भी है...हंस के उसपार जाना पडेगा...सावन कुमार त्यांचे आयुष्य या गाण्याप्रमाणेच जगले. ते हा समुद्र पार करून निघून गेले. ओम शांती’
सावनजी तुमची खूप आठवण येईल : राकेश रोशन
सावन कुमार टाक यांनी राकेश रोशन (Rakesh Roshan) यांच्या 'कहो ना... प्यार है' या चित्रपटासाठी अनेक गाणी लिहिली होती. याची आठवण राकेश रोशन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. ‘सावनजी नेहमी तुमची आठवण येईल. तुमच्या आत्म्याला चिरशांती लाभो’, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :