Salman Khan Mumbai Police : सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी वापरलेली बाईक कोणाची? मुंबई पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर...
Salman Khan Mumbai Police : हल्लेखोर आरोपींनी सलमान खानच्या घराजवळ गोळीबार करण्यासाठी वापरलेल्या बाईकबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Salman Khan Mumbai Police : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) तपासात मोठी माहिती समोर आली आहे. हल्लेखोर आरोपींनी सलमान खानच्या घराजवळ गोळीबार करण्यासाठी वापरलेल्या बाईकबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करण्यासाठी वापरलेली बाईक ही रायगडमधील असल्याची माहिती आहे.
सलमान खान राहत असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy Apartment) बाहेर रविवारी पहाटेच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली. हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोराचा फोटो समोर आला आहे. आता पोलिसांकडून विविध अँगलने तपास सुरू झाला आहे.
हल्लेखोरांनी वापरलेली बाईक कोणाची?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी हल्लेखोरांनी बाईक खरेदी केली होती. या दोन्ही आरोपींनी रायगड जिल्ह्यातून जुनी बाईक खरेदी केली होती असे तपासात समोर आले आहे. ही सेकंड हँड खरेदी केलेली बाईक घेऊन आरोपी मुंबईत दाखल झाले आणि गोळीबार केला. पोलिसांनी आता या बाईकच्या खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केली आहे.
सलमान खानच्या घराबाहेर करण्यात आलेला गोळीबार हा सुनियोजित कट आहे. आरोपींनी गोळीबार केल्यानंतर मुंबईतून बाहेर पडण्याचे नियोजन त्यांनी केले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. आता बाईक खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का, त्यातून आरोपींपर्यंत पोहचता येईल का, हे तपासात स्पष्ट होईल.
सलमान खानला धमकी कुठून?
सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर फेसबुकच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली. होती. या फेसबुकचा आयपी अॅड्रेस कॅनाडातील असल्याचे तपासात समोर आहे. अनमोल बिश्नोई या नावाच्या प्रोफाईलवरून जबाबदारी घेण्यात आली होती.
सलमानच्या घरात गोळी
या गोळीबारातील एक गोळी सलमान खानच्या घरात घुसली असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने गॅलरीमध्ये कुणी नव्हतं, गॅलरी रिकामी होती. पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातील एक गोळी गॅलरीतील पडद्यातून आरपार गेली आणि भिंतीवर लागली असल्याचे समोर आले.
गोळीबाराचा संबंध बिश्नोई गँगशी
गोळीबाराचा लॉरेन बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंध आहे. याआधी देखील बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात काळविटांना देवासमान मानले जाते. 1998 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच लॉरेन्सकडून सलमान खान धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता, घराजवळ गोळीबार झाला.