Saif Ali Khan Attack : 'हल्लेखोराने दागिन्यांना हातही लावला नाही', आरोपीचा नेमका प्लॅन काय होता? करिनाने पोलिसांना जबाबात सगळंच सांगितलं...
Kareena Kapoor Khan on Saif's Attack : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणात पोलिसांनी करिना कपूरचा जबाब नोंदवला आहे, त्यातून मोठी माहिती समोर आली आहे.

Saif Ali Khan Knife Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी आता त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर-खान हिचा जबाब नोंदवला आहे. करीनाच्या जबाबातून पोलिसांना आरोपीबाबत मोठी माहिती मिळाली आहे. घरात घुसलेला हल्लेखोर अतिशय आक्रमक होता, असं करीनानी पोलिसांना सांगितलं आहे.
पोलिसांनी करीनाचा जबाब नोंदवला
16 जानेवारी रोजी सैफ अली खानच्या राहत्या घरी अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. हा अज्ञात हल्लेखोर चोरीच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान, आता करीनाच्या जबाबानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
'हल्लेखोराने दागिन्यांना हातही लावला नाही'
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री करीनाने तिच्या जबाबात पोलिसांना सांगितलं आहे की, जेव्हा आरोपी घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक होता पण, त्याने घरातून काहीही चोरी केली नाही. करीनाच्या या जबाबानंतर पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
हल्लेखोर खूप आक्रमक होता : करीना कपूर
करीनाने पोलिसांना सांगितले की, जेव्हा सैफसोबत भांडताना, झटापट करते वेळी आरोपी खूप आक्रमक होता, पण कुटुंब कसेतरी त्याच्यापासून दूर पळून जाण्यात आणि घराच्या 12 व्या मजल्यावर जाण्यात यशस्वी झाले... पोलिस सूत्रांनी सांगितलं की, या घटनेमुळे करीना खूपच चिंतेत होती. ती चिंतेत असल्यामुळे तिची बहीण करिश्मा कपूर तिला तिच्या घरी घेऊन गेली. पोलिसांना दिलेल्या जबाबात करीनाने म्हटलं आहे की, दागिने घरात समोर ठेवले होते, पण हल्लेखोराने त्यांना हातही लावला नाही.
घटनास्थळी आरोपीच्या बोटांचे ठसे
मुंबई पोलिसांचे डीसीपी झोन-9 दीक्षित गेडाम यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या आरोपीने फायर एस्केपमधून घरात प्रवेश केला. आतापर्यंतच्या तपासात एका आरोपीची ओळख पटली आहे आणि त्याला अटक करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. 10 पथके वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. यापूर्वी, घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी सैफ अली खानच्या घरी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमनेही आरोपींच्या बोटांचे ठसे सापडल्याचा दावा केला होता.























