एक्स्प्लोर
न संपणारा 'बोगदा'
एक निमित्त होतं, आणि आईला एका दुर्धर आजार होतो. यातून सुटण्याची आईची धडपड सुरु होते. शेवटचे दिवस एका गावात व्यतित करण्याबाबत दोघींचं एकमत होतं. मग दोघी या प्रवासाला निघतात. त्या प्रवासादरम्यान दोघींच्या नात्याला नवं वळण मिळतं. एकमेकींबद्दल काही साक्षात्कार होतात. त्याचं बोट पकडून हे नातं 'बोगदा' पार करतं. त्याची ही गोष्ट.
निशिता केणी या दिग्दर्शिकेचा हा पहिला सिनेमा आहे. आता ही निशिता कोण असा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिक आहे. पण इंडस्ट्रीत केणी हे आडनाव नवं नाही. या आडनावाबद्दल कमालीचा आदर आहे. कारण ही नितीन केणी यांची मुलगी. नितीन यांचं मराठीतलं योगदान मोठं आहे. अनेक चांगले हिंदी, मराठी सिनेमे त्यांनी दिले आहेत. त्यांची मुलगी दिग्दर्शनात उतरते आहे. त्याचं रीतसर शिक्षणही तिनं घेतलं आहे. तिचा 'बोगदा' हा सिनेमा पाहताना, तिने घेललेलं शिक्षण जागोजागी दिसत राहतं. फ्रेमिंग, कम्पोझिशन्स, शांततेचा वापर करण्याचा केलेला प्रयत्न....हे पाहता इच्छेला तांत्रिक बाबींचं लाभलेलं शिक्षण दिसतं. पण इथे थोडी गल्लत झाली आहे. इथे, तांत्रिक बाबीत सिनेमा जास्त अप-टू-डेट असला, तरी भावना आणि त्याच्या सर्वंकष परिणामाबाबत मात्र हा सिनेमा गरजेपेक्षा जास्त संथ, मोठा आणि त्यामुळे कंटाळवाणा होतो. सिनेमाचा एकूण विषय छान असला, तरी त्या नात्याला असलेली काळी किनार गडद होत होत, संपूर्ण सिनेमा व्यापून टाकू लागते, त्यामुळे हा विषय नैराश्यग्रस्त होतो. हा दिग्दर्शिकेचा पहिला प्रयत्न आहे, त्याचं कौतुक आहेच, पण त्याच नवखेपणातून आर्ट फिल्मचा आव दिसू लागतो. त्यामुळे हा 'बोगदा' संपता संपत नाही. परिणाम सिनेमा संपता संपता हाती येतं ते इरिटेशन.
सिनेमाचा विषय यापूर्वी काही सिनेमातून हाताळला गेला आहे. खूप पूर्वी आभिजीत खाडे या लेखकाची एकांकिकाही आली होती. मुक्ती भवन नावाचा हिंदी सिनेमाही आला होता.. आठवतोय का? तशीच याची गोष्ट आहे. एका छोट्या गावात मायलेकी राहतायत. आईने मोठ्या हिमतीने मुलीला मोठं केलंय. फणसाचे गरे तळून घर चालवते आई. पण आता आई थकली आहे. मुलगीही कमावती आहे. आई आणि मुलीत वयाचं अंतर जरा जास्त आहे. त्यामुळे थकल्या आईचा आधार आपली मुलगी तेजू हीच आहे. एक निमित्त होतं, आणि आईला एका दुर्धर आजार होतो. यातून सुटण्याची आईची धडपड सुरु होते. शेवटचे दिवस एका गावात व्यतित करण्याबाबत दोघींचं एकमत होतं. मग दोघी या प्रवासाला निघतात. त्या प्रवासादरम्यान दोघींच्या नात्याला नवं वळण मिळतं. एकमेकींबद्दल काही साक्षात्कार होतात. त्याचं बोट पकडून हे नातं 'बोगदा' पार करतं. त्याची ही गोष्ट.
चित्रपटाची कथा विलोभनीय आहे. कारण मानवी नात्यांचे नव्याने होणारे साक्षात्कार, चकित करणारे अनुभव.. पदरी येणारे अपेक्षाभंग.. नव्याने लाभणारे मापदंड हे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर येऊ शकतात. कारण परिस्थिती वेळोवेळी तुम्हाला तसं वागायला भाग पाडत असते. त्यामुळे नात्यांवर बेतलेले सिनेमे पुन्हा पुन्हा आले तरी ते कंटाळवाणे होत नाही. कारण जेवढी माणसं.. तेवढे त्यांचे स्वभाव.. तितके नात्यांचे रंग. इथेही ती मजा आहे. तेजस्विनी आणि तिच्या आईमध्ये जनरेशन गॅप आहेच. एकमेकींबद्दल कमालीचं प्रेम असलं तरी आपापला स्वाभिमान आहे. परिस्थितीकडे तटस्थपणे पाहण्याची कुवत आहे. या दोघींचं नातं अधोरेखित होत असताना, त्यांची वर्तणूक सहज सोपी वाटायला हवी होती. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिचा आपला असा वेग असतो. पैस असतो. म्हणूनच कोणी शांत वाटतो, तर कोणी चंचल. या विविधतेतूनच नाती जन्माला येतात. परस्परविरोधी असूनही बंध निर्माण होतात. या सिनेमात तसं होत नाही. दिग्दर्शिकेला अभिप्रेत असलेला वेग घेऊन प्रत्येक व्यक्तिरेखा सिनेमात येते. मग ती तेजस्विनी असो. आई असो किंवा त्यांचा ड्रायव्हर किशोर असो. खरंतर किशोर आल्यामुळे हा सिनेमा जास्त खोटा होतो. आणि शेवटी.. शेवट.. म्हणजे, या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर नेमकी मानसिकता कशी असणार आहे.. त्यावर विचार व्हायला हवा होता. झुंबड गाणं ऐकायला बरं वाटत असलं तरी ते ज्या टप्प्यावर सिनेमात येतं ते अगदीच अमान्य होऊ लागतं.
अभिनयाबाबत सुहास जोशी आणि मृण्मयी देशपांडे यांनी अनुक्रमे आई-मुलीची भूमिका केलीय नेटाने. पण सिनेमाचा वेग खूप कमी असल्याने या व्यक्तिरेखांचे अपेक्षित रंग मनात घर करत नाही. त्यातल्या आईबद्दल सहानुभूती वाटता वाटता राहून जाते.
हा सिनेमा पोएटिक आहे. त्याला त्याचा असा वेग आहे. पण तो नियंत्रणात असायला हवा होता. सिनेमाची लांबी जी आत्ता दोन तासांवर झाली आहे, ती १०० मिनिटांत संपायला हवी होती असं वाटून जातं. हा प्रयत्न म्हणून याकडे पाहायला हवं. सामान्यजनांना हा सिनेमा पाहिल्यानंतर पदरी निराशा येईल. एक डाव भूताचा असतो असं म्हणतात. तसं समजूया. एक नक्की, या मुलीला फ्रेमिंगचं, कम्पोझिशन्सचं चांगल भान आहे. ते यात दिसतंही. पण यातली गोष्टही तितकीच महत्वाची हवी. असो. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत दोन स्टार्स.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
विश्व
क्रीडा
Advertisement