Rekha Kamat : आजच्या तरुणांची आजी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन
Rekha Kamat : दिग्गज अभिनेत्री रेखा कामत यांचे वयाच्या 89 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
Rekha Kamat : आजच्या तरुणाईची लाडकी आजी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी वृद्धापकाळाने माहिम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजच्या तरुणांना त्या आजी म्हणून ठाऊक असल्या तरी त्यांनी कृष्णधवल चित्रपटांमध्येही नायिका म्हणून केलेल्या भूमिका गाजल्या होत्या. 1952 मध्ये प्रदर्शित 'लाखाची गोष्ट' हा रेखा कामत यांचा पहिला चित्रपट. याच त्यांची बहिण चित्रा यांनीसुद्धा काम केलं होतं. राजा परांजपे, ग. दि माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. कुमुद आणि कुसुम ही जुन्या वळणाची नावं नकोत, चित्रपटासाठी जरा आकर्षक नावं पाहिजेत म्हणून 'गदिमां'नी रेखा आणि चित्रा असं या बहिणींचं नामकरण केलं होतं.
त्या पाच बहिणी आणि दोन भाऊ अशी सात भावंडे. त्या मोठ्या तर चित्रा त्यांच्या पाठची. त्यांचे वडील आर्मी व नेव्ही स्टोअरमध्ये 'लिपिक' म्हणून नोकरी करायचे. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण कुंभारवाडा येथील शाळेत झाले. त्यानंतर त्या 'प्लाझा' चित्रपटगृहाजवळील मिरांडा चाळीत राहायला गेल्या. त्यांचे पुढील शिक्षण छबिलदासमध्ये झाले. वसंतराव कुलकर्णी हे त्यांचे गाण्यातील गुरू. शाळेत असतानाच त्यांनी नृत्य व गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. प्रसिद्ध नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले. गणेशोत्सवात मेळ्यांमध्ये काम केले. नृत्यगुरू सचिन शंकर यांच्या 'रामलीला' नृत्यनाटिकेत काम केल्यानंतर दोन्ही बहिणींना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. रेखा याच नावांनी त्यांनी मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि पुढे हेच नाव त्यांची ओळख झालं. रेखा कामत यांचे 'गृहदेवता' (दुहेरी भूमिका), 'कुबेराचे धन', 'गंगेत घोडे न्हाले', 'मी तुळस तुझ्या अंगणी', 'माझी जमीन','अगंबाई अरेच्चा' हे गाजलेले चित्रपट. 'नेताजी पालकर' आणि 'जगाच्या पाठीवर' चित्रपटात त्यांनी लावणी सादर केली होती.
केवळ चित्रपटच नव्हे तर व्यावसायिक मराठी रंगभूमीवरही रेखा कामत यांनी अभिनयाचा ठसा उमटवला होता. 'सौभद्र', ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ इत्यादी नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. अमोल पालेकर (पार्टी) आणि विजया मेहता (यातनाघर) यांच्या प्रायोगिक नाटकांमध्येही रेखा कामत यांनी काम केले होते. त्यांनी नाटकांचे जवळ जवळ पाच हजार प्रयोग केले.
रंगमंचानंतर त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयकौशल्याची प्रचिती दिली होती. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली मालिका. या मालिकेतील त्यांची ‘आक्का’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. ‘सांजसावल्या’ ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या त्यांच्या आणखी काही गादलेल्या मालिका. या मालिकेतील त्यांची ‘माई आजी’ सगळ्यांच्या आवडीची झाली होती. तरुण पिढीला य़ाच भूमिकेमुळे रेखा कामत हे नाव माहिती झाले. चित्रपट, रंगमंच, मालिकांसोबत अनेक जाहिरातींमधूनही त्यांनी ‘आजी’ची भूमिका साकारली होती.
लाखाची गोष्ट च्या पटकथा संवादाची बाजू सांभाळणाऱ्या ग. रा. कामत यांच्याशी रेखा यांचा 1953 मध्ये विवाह झाला. लग्नानंतरही त्यांनी चित्रपटात काम सुरु ठेवले. सासरकडूनही कोणताही विरोध झाला नाही. रेखा यांना संजीवनी आणि माधवी या दोन मुली आहेत.
एबीपी माझाची रेखा आजींना भावपूर्ण श्रद्धांजली.
संबंधित बातम्या
Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात कोरोनाचा शिरकाव, अतुल कपूरला कोरोनाची लागण
नागराज मंजुळे, सिद्धार्थ रॉय कपूरची 'मटका किंग' वेब सीरिज होणार रिलीज; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Thipkyanchi Rangoli : अपूर्वा आणि शशांकच्या केळवणाला दीपानं लावली हजेरी; ठिपक्यांची रांगोळी मालिकेचा खास एपिसोड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha