Ravrambha: 'नेहमी प्रश्न पडायचा महाराज असे रागीट खरंच दिसायचे का? या सिनेमात...'; 'राव रंभा' पाहिल्यानंतर महेश टिळेकर यांनी शेअर केली खास पोस्ट
महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी 'राव रंभा' (Ravrambha) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
![Ravrambha: 'नेहमी प्रश्न पडायचा महाराज असे रागीट खरंच दिसायचे का? या सिनेमात...'; 'राव रंभा' पाहिल्यानंतर महेश टिळेकर यांनी शेअर केली खास पोस्ट Ravrambha film release Mahesh Tilekar share special post on social media about movie Ravrambha: 'नेहमी प्रश्न पडायचा महाराज असे रागीट खरंच दिसायचे का? या सिनेमात...'; 'राव रंभा' पाहिल्यानंतर महेश टिळेकर यांनी शेअर केली खास पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/a8160b2703bb1fc0a1a992852a7577241685079469786259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ravrambha: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ओम भूतकर (Om Bhutkar) आणि शंतनू मोघे (Shantanu Moghe) यांचा 'राव रंभा' (Ravrambha) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाबाबत नुकतीच महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी 'राव रंभा' या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
महेश टिळेकर यांची पोस्ट
महेश टिळेकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'डोळ्यात आणि ह्रुदयात साठवावा 'राव रंभा', छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करीत प्रेक्षकांच्या आणि विशेषतः शिवप्रेमींच्या भावनांशी खेळून सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड करणारे काही ऐतिहासिक सिनेमे अलीकडच्या काळात बरेच आले.पण याला एक अपवाद म्हणजे एखाद्या रुक्ष परिसरात सुंदर कमळ फुलांनी भरलेलं जलाशय दिसावं अगदी तसाच 'राव रंभा' सिनेमा आहे.'
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'हा सिनेमा आपल्याला सर्वच बाबतीत तृप्त करून एक सुखद अनुभुती देतो. प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्या मिळाव्यात म्हणून मुद्दाम घुसवलेले ,फिल्मी वाटावे असे संवाद ह्या सिनेमात नाहीत आणि म्हणूनच सिनेमा भावतो.प्रताप गंगावणे यांची पटकथा आणि संवाद कुठेही आपल्याला " कधी संपतोय सिनेमा?" हा प्रश्न मनात येऊ देत नाहीत. सिनेमात विविध पात्रे साकारणारे कलाकार विनाकारण बेबिंच्या देठा पासून दात ओठ खात राक्षसा सारखे किंचाळताना दिसत नाहीत आणि याचमुळे कलाकारांचा अभिनय लक्षात राहतो.सिनेमात अभिनेता संतोष जुवेकर याने साकारलेला खलनायक इतका चीड आणनारा की जुन्या जमान्यातील खलनायक राजशेखर यांची आठवण आली आणि खंत जाणवली की संतोष इतका गुणी कलाकार मराठीत असताना मराठीत त्याचं म्हणावं तितकं कौतुक झालं नाही.'
View this post on Instagram
'सिनेमात मुख्य भूमिकांमध्ये असणारे ओम भूतकर, मोनालिसा बागल ह्या जोडीचा सहज अभिनय हा स्मरणात राहील असा आहे. अभिनेता अशोक समर्थ यांनी साकारलेला तडफदार सरनोबत, त्यांच्या आवाजाची जरब एकदम लाजवाब.युद्धात धारातीर्थी पडतानाचा त्यांचा सीन अंगावर शहारे आणनारा.शंतनु मोघे महाराजांच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे जान आणतो.नाहीतर चेहरा उग्र ठेवून सतत कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार पाहिले की नेहमी प्रश्न पडायचा महाराज असे रागीट खरंच दिसायचे का? या सिनेमात छोट्या भूमिकांमध्ये इतर कलाकारांनीही उत्तम साथ दिली आहे. सिनेमाचं अर्ध यश हे प्रत्येक भूमिकेसाठी केलेली योग्य कलाकारांची निवड हे तर आहेच पण त्याबरोबर कॅमेरामन संजय जाधव यांच्यामुळे हा सिनेमा नेत्रदीपक झाला आहे हे प्रत्येक फ्रेम मध्ये जाणवते. चित्रपटातील साहस दृश्ये काळजाचा ठोका चुकविणारी आणि याआधी मराठीतल्या कुठल्याही ऐतिहासिक सिनेमात क्वचितच पहायला मिळालेली अशी आहेत.निर्मितीत कुठेही कसर न ठेवता प्रामाणिकपणे हा सिनेमा भव्य स्वरूपात साकारण्याचे श्रेय दिग्दर्शक अनुप जगदाळे यांचं आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या निर्मात्यांचे...
मराठी माणसाचा हा भव्य सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच पाहिल्यास 'राव रंभा ' अनेक काळ डोळ्यात आणि हृदयातही राहील.' असंही महेश यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)