मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह विनोद करणं अंगलट, अभिनेता रणदीप हुडाला अटक करण्याची मागणी
अभिनेता रणदीप हुडा त्याच्या जुन्या व्हिडीओमुळे अडचणीत सापडला आहे. बसपाच्या प्रमुख मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह विनोद करणं रणदीपच्या अंगलट आलं असून त्याच्या अटकेची मागणी होत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा त्याच्या एका जुन्या व्हिडीओमुळे अडचणीत आला आहे. रणदीपचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांचं नाव घेत आक्षेपार्ह शब्द वापरुन थट्टा करताना दिसत आहे. रणदीपचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संताप आहे. रणदीपला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.
मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह थट्टा
रणदीप हुडाच्या या व्हिडीओमध्ये तो सोशल मीडियाबद्दल बोलत आहे. यावेळी मी तुम्हा एक 'डर्टी ज्योक' सांगतो असं तो समोर बसलेल्या प्रेक्षकांना बोलताना दिसत आहे. तो म्हणतो की, "मायावती दोन मुलांसह जात असतात. यावेळी एक व्यक्ती त्यांना विचारतो की, 'ही जुळी मुलं आहेत का?' त्यावर मायावती म्हणतात नाही, 'एक चार वर्षांचा आहे आणि दुसरा आठ वर्षांचा.' यानंतर रणदीप हुडा जे म्हणाला ते अनेकांना अजिबात आवडलं नाही.
सोशल मीडियावर लोकांचा संताप
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे स्वत:चे समर्थक आहेत, जे त्यांना 'आयर्न लेडी' म्हणतात. तसंच राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन केल्याने लोक त्यांचं कौतुकही करतात. परंतु रणदीप हुडाच्या आक्षेपार्ह विनोदामुळे लोकांमध्ये संताप आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपला राग व्यक्त करत आहेत. एका युझरने लिहिलं आहे की, "रणदीप हुडा हा ज्योक नाही. आजपर्यंत कोणत्याही पुरुष नेत्यावर थट्टा होत नाही. आणि तुम्ही एका दलित आणि मागासांच्या महिला नेत्याची अशी अश्लील थट्टा केली आहे. हे चुकीचं आहे."
तर आणखी एका युझरने लिहिलं आहे की, "तुमच्या आजूबाजूला अनेक महिला आहेत, मग तुम्ही आयर्न लेडी मायावती यांचीच थट्टा का केली?"
कॉमेडियन मॅथ्यूकडूनही माफी
काही दिवसांपूर्वी कॉमेडियन अबीश मॅथ्यूने आपल्या एका जुन्या ट्वीटमुळे बसपाच्या प्रमुख मायावती यांची माफी मागितली होती. त्या ट्वीटमध्ये मॅथ्यूने मायावती यांच्याबाबत अपमानास्पद गोष्टी लिहिल्या होत्या.