Ramayana : 'रामायणा'मुळे रामानंद सागर 10 वर्ष अडकले होते कोर्ट-कचेरीत, काय झालं होतं नेमकं?
Ramanand Sagar Ramayana : रामायण मालिकेमुळे रामानंद सागर यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. जवळपास 10 वर्ष खटला चालला होता.
Ramanand Sagar Ramayana : रामानंद सागर (Ramand Sagar) यांच्या 'रामायण' (Ramayana) ही मालिका 1987 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली. या मालिकेने लोकप्रिय मालिकेचे शिखर गाठले होते. रामायण ही मालिका वाल्मिकी रामायण आणि तुलसीदास यांच्या रामचरितमानस याच्यावर आधारीत आहे. कलाकारांचा सहजसुंदर अभियनाने प्रेक्षकांची मने जिंकली. दर रविवारी प्रसारीत होणाऱ्या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांना असायची. मात्र, रामायण मालिकेमुळे रामानंद सागर यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता.
रामानंद सागर यांच्यावर होता दबाव
'रामायण' मालिकेतील 78 व्या भागात सीता माता ही पृ्थ्वीत लीन होते. त्यानंतर लोकांनी त्या पुढील गोष्ट सांगण्याची मागणी केली. इतकंच नाही तर दूरदर्शन आणि रामानंद सागर यांच्यावरही दबाव आणण्यास सुरुवात केली. मात्र, रामानंद सागर त्या पुढील गोष्ट सांगण्यास तयार नव्हते. सीता मातेने पृथ्वीत स्वत:ला लीन करून घेतल्यानंतर पुढील गोष्ट दाखवण्यास नकार दिला. रामानंद सागर म्हणाले की त्यांनी या पुढील गोष्ट दाखवली तर ती कल्पनेवर आधारीत असेल. वाल्मिकी रामायण आणि तुलसीदास यांच्या रामचरितमानस मध्ये रामायणाची पुढील गोष्टच नमूद केली नाही. त्यामुळे पुढील गोष्ट कशी सांगता येईल? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.
10 वर्ष चालला कोर्टात खटला...
दूरदर्शन आणि इतर लोकांनी सांगितल्यानंतर रामानंद सागर यांनी रामायणातील पुढील भाग सांगण्यास होकार दिला. रामानंद सागर यांनी 'रामायण उत्तर कांड' नावाचा सिक्वेल बनवला. पण त्यात दाखवलेली कथा लोकांना आवडली नाही. त्यावरून बराच वाद झाला, लोकांनी आक्षेपही व्यक्त केला आणि कोर्टात खटला दाखल करण्यात आला. काही वृत्तांनुसार,'रामायण उत्तर कांड'मुळे रामानंद सागर यांना 10 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या.
क्लॅपर बॉय म्हणून रामानंद सागर यांचे सिनेसृष्टीत पदार्पण
रामानंद सागर यांची रामायण ही मालिका 1987 मध्ये प्रसारित झाली होती. लॉकडाऊनमध्ये देखील ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. 'रामायण' मालिकेतील संगीत लोक आजही आवडीनं ऐकतात. या मालिकेला संगीत रवींद्र जैन यांनी दिले. रामायण या मालिकेची निर्मिती, दिग्दर्शन करणारे रामानंद सागर यांचा सिनेसृष्टीतील प्रवास क्लॅपर बॉय म्हणून झालेला. क्लॅपर बॉय म्हणून त्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी पृथ्वी थिएटर्समध्ये सहाय्यक स्टेज मॅनेजर म्हणून काम केले. राज कपूरच्या बरसात या चित्रपटाची कथा आणि पटकथा रामानंद सागर यांनी लिहिली होती. 1968 मध्ये आँखे चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. 1987 मध्ये चित्रपटांव्यतिरिक्त रामानंद यांनी रामायणाची निर्मिती केली.