(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राखी सावंत आणि तिच्या भावाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
वाद आणि राखी सावंत हे समीकरण बनलंय. आता फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने राखी पुन्हा चर्चेत आली आहे.
मुंबई : अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा भाऊ राकेश आनंद सावंत यांच्याविरोधात दिल्लीतील विकासपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सहा लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशनंतरच 22 फेब्रुवारी रोजी राखी आणि तिच्या भावाविरोधात तक्रार दाखल झाली होती. बिझनेसमन शैलेंद्र श्रीवास्तव यांच्या तक्रारीनंतर राखी आणि राकेश सावंत यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाला आहे.
तक्रारीत म्हटलं आहे की, राखी सावंत आणि तिच्या भावाने मिळून संस्था सुरु करण्याची आणि चित्रपट प्रदर्शित करण्याच्या नावावर शैलेंद्र श्रीवास्तव यांच्याकडून सहा लाख रुपयांची गुंतवणूक करुन घेतली होती. पण प्रत्यक्षात कोणतंही काम पूर्ण झालं नाही आणि बिझनेसमन शैलेंद्र श्रीवास्तव यांना मोठं नुकसान झालं. यामुळे त्यांनी दोघांविरोधात आयपीसीच्या कलम 420, 120 ब, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मी निर्दोष, राखी सावंतचा दावा या प्रकरणात राखी सावंतने आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे आहे. तसंच तक्रारदाराविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, "या प्रकरणाशी माझं काही देणं-घेणं नाही. माझी टीम मानहानीचा खटला दाखल करणार आहे. हा एक पब्लिसिटी स्टंट असून माझी टीम त्यावर कारवाई करेल." आता या प्रकरणात पुढील कोणती कारवाई होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
बिग बॉसनंतर राखी सावंत पुन्हा लाईमलाईटमध्ये राखी सावंत बिग बॉसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शोमध्ये येण्यासाठी तिच्याकडे कोणतंही काम नव्हतं आणि ती लाईमलाईटपासून दूर होती. पण देशातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोने तिला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दिली आणि तिने संधीचा फायदा घेत सगळ्यांचं मन जिंकलं. आता या गुन्ह्यामुळे ती पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.