बाळासाहेब ठाकरेंचा जीवनपट आता हिंदीतून उलगडणार
राहुल यांनी आता आपल्या लाडक्या आजोबांवर म्हणजे बाळासाहेबांवर बायोपिक बनवण्याचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्याची माहिती त्यांनी दसऱ्याला फेसबुकवर टीझर पोस्टर रिलीज करुन दिली.
मुंबई : ना उद्धव ठाकरे, ना राज ठाकरे आणि ना संजय राऊत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर हिंदी चित्रपट बनवण्याच्या शर्यतीत राहुल ठाकरे बाजी मारणार अशी चिन्हं दिसत आहेत. राहुल ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू आहेत. बाळासाहेबांचे मधले चिरंजीव जयदेव आणि त्यांच्या पहिल्या पत्नी स्मिता ठाकरे यांचे राहुल हे सुपुत्र आहेत. त्यांनी कॅनडात फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं आहे. आमिर खानच्या पीके चित्रपटासाठी त्यांनी राजू हिरानी यांचा सहाय्यक म्हणूनही काम पाहिलं होतं. राहुल यांनी आता आपल्या लाडक्या आजोबांवर म्हणजे बाळासाहेबांवर बायोपिक बनवण्याचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्याची माहिती त्यांनी दसऱ्याला फेसबुकवर टीझर पोस्टर रिलीज करून दिली. मुंबईतल्या माहीमच्या मुख्य नाक्यावरही काल रात्री या चित्रपटाचं बॅनर झळकताना दिसलं.
राहुल ठाकरे यांच्या आगामी चित्रपटाचं नाव 'बाळासाहेब ठाकरे' हेच असून, या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी ते स्वतः सांभाळणार आहेत. हिंदीतले एक आणि मराठीतले एक असे दोन प्रख्यात लेखकही या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणार आहेत. पण दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण करणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे. संजय राऊत यांच्या बाळकडू या मराठी चित्रपटात नायकाला बाळासाहेबांचा आवाज ऐकू येतो असं कथानक रचून वेळ निभावून नेण्यात आली होती. आवाजाचे किमयागार चेतन सशितल यांनी त्या चित्रपटात बाळासाहेबांचा हुबेहूब आवाज काढला होता. पण साक्षात बाळासाहेबांची भूमिका साकारायची तर सर्वसामान्य शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारा मराठी माणूस सहज स्वीकारेल अशा क्षमतेचा अभिनेता कुठून आणणार हा मुख्य प्रश्न आहे. बाळासाहेबांसारखा दिसणारा, त्यांचासारखा वावरणारा, त्यांच्या लकबी सहज आत्मसात करणारा अभिनेता कोण असू शकतो हा सध्या कुतूहलाचा विषय आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यंतरी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही बाळासाहेबांवरच्या चित्रपटाचा विषय समोर ठेवून काही मान्यवरांसोबत चर्चाही केली होती. चित्रपटाच्या पडद्यावर बाळासाहेब म्हणून सर्वसामान्यांना पटेल असा अभिनेता शोधायचा तर त्याची काय गुणवैशिष्ट्यं लक्षात घ्यावीत, त्याच्यात काय बारकावे पाहावेत यावर त्या बैठकीत बरीच चर्चा झाली होती. मात्र ती बैठक राहुल ठाकरे यांच्या चित्रपटासाठी होती की, उद्धव आणि संजय यांच्या मनातही बाळासाहेबांवर चित्रपट बनवण्याचा प्लॅन आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, राहुल ठाकरे यांनी मात्र आपल्या जडणघडणीचं श्रेय बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आपले काका उद्धव-राज आणि आपली आई स्मिता ठाकरे यांना दिलं आहे. राहुल यांची ती फेसबुक पोस्ट पाहता त्यांच्या चित्रपटाला मातोश्री आणि कृष्णकुंजकडून कशी साथ मिळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.