Kamal Haasan, Queen Elizabeth II : कमल हासनच्या चित्रपटाच्या सेटवर उपस्थित होत्या राणी एलिझाबेथ, आजही चाहत्यांना रिलीजची प्रतीक्षा!
Queen Elizabeth II : कमल हसन यांच्या ‘मरुधानयागम’ (Marudhanayagam) या चित्रपटाच्या सेटवर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी खास पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.
Kamal Haasan, Queen Elizabeth II : काही कलाकार आजघडीला भलेही अतिशय नावाजले असतील. मात्र, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एकदा तरी असा काळ नक्कीच आला असेल, जेव्हा त्याला संघर्ष करावा लागला असेल. संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही. साऊथच नव्हे तर, बॉलिवूड गाजवलेल्या अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) यांच्याबाबतीतही असेच काहीसे घडले आहे. त्यांनाही कधीकाळी या संघर्षाचा सामना करावा लागला होता. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II ) यांचे नुकतेच निधन झाले. यादरम्यान आता कमल हासन यांचा एक चित्रपट प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या सेटवर स्वतः महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी हजेरी लावली होती.
कधीकधी काही चित्रपट पूर्ण व्हायला अनेक वर्ष लागतात. बऱ्याचदा चित्रपट सुरु तर केला जातो, मात्र नंतर तो डब्यात जातो. असंच काहीसं कमल हासन यांच्या ‘मरुधानयागम’ (Marudhanayagam) या चित्रपटासोबत झालं होतं. कमल हसन यांच्या या चित्रपटाच्या सेटवर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी खास पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.
भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट असल्याचा दावा!
कमल हसन यांचा 'मरुधनयागम' हा चित्रपट एक ऐतिहासिक ड्रामा चित्रपट होता, ज्याचे शूटिंग 1997मध्ये सुरू झाले होते. इतकेच नव्हे, तर 1991पासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू होते. त्याकाळात 80 कोटींचे बजेट असलेला 'मरुधनयागम' हा भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट असल्याचे देखील म्हटले गेले होते. मात्र, काही काळानंतर या चित्रपटाच्या सर्व चर्चा बंद झाल्या. मात्र, स्वतः महाराणी एलिझाबेथ यांनी हजेरी लावल्याने हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता.
1997मध्ये सुरु झाले होते चित्रीकरण
चेन्नईच्या एमजीआर फिल्म सिटीमध्ये 1997 दरम्यान 'मरुधनयागम' या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. तेव्हा महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी या चित्रपटाच्या सेटला भेट दिली होती. तब्बल 20 मिनिटे त्या चित्रपटाच्या सेटवर उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्यासोबत तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी देखील हजर होते. कमल हासन यांच्या या चित्रपटाची कथा 18व्या शतकातील मोहम्मद युसूफ खान नावाच्या योद्ध्यावर आधारित होती. या चित्रपटात कमल हासन मुख्य भूमिका साकारणार होते.
चाहत्यांना चित्रपटाची प्रतीक्षा
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. याच दरम्यान एका युझरने या चित्रपटाविषयची आठवण शेअर केली. ‘मरुधानयागम’ चित्रपटाच्या सेटवरील महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि कमल हासन यांचा फोटो शेअर करत चाहत्याने हा चित्रपट पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच, कमल हासन यांनीच या चित्रपटात मुख्य भूमिका साकारावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
चित्रपटाचे मोठे बजेट आणि आर्थिक टंचाई यामुळे हा चित्रपट बंद पडला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी कमल हासन यांनी पुन्हा एकदा हा चित्रपट सुरु करण्याची मनीषा बोलून दाखवली होती.
हेही वाचा :