Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने व्यक्त केली समुद्रासारखं होण्याची इच्छा; म्हणाली,"मी वाहणारी नदी"
Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राला समुद्रासारखं अथांग होण्याची इच्छा आहे.
Priyanka Chopra : 'मिस वर्ल्ड' प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडसह हॉलिवूडवर राज्य केलं आहे. अभिनेत्रीचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा ठरतो. प्रियंकाने नुकतीच 'जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल'मध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने तिचं आयुष्य, करिअर, अनुभव यासर्व गोष्टींबद्दल भाष्य केलं. त्यावेळी "मी वाहणारी नदी आहे, एक दिवस समुद्र होण्याची माझी इच्छा आहे", असं प्रियंका म्हणाली.
'जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल'दरम्यान प्रियांका चोप्रा म्हणाली,"मला तलावासारखं व्हायचं नाही. मी वाहणारी नदी आहे. एक दिवस समुद्र होण्याची माझी इच्छा आहे". प्रियंकाचा आज जागतिक पातळीवर दबदबा आहे. मिस वर्ल्ड, नॅशनल अॅवॉर्ड विजेती बॉलिवूड अभिनेत्री, हॉलिवूड स्टार, गायिका, निर्माती, लेखिका, उद्योगपती सारख्या विविध क्षेत्रांत प्रियांकाने आपल्या कामाचा झेंडा रोवला आहे.
दररोज सर्वोत्कृष्ट काम करा, यशाचं फळ मिळेल : प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा म्हणाली,"सिनेसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय माझा नव्हता. या क्षेत्रात मला जबरदस्तीने ढकललं गेलं आहे. त्यानंतर सहकलाकारांकडून अभिनय म्हणजे नक्की काय हे मी शिकले आहे. एखाद्या गोष्टीत मी 100% देत असते. दररोज सर्वोत्कृष्ट काम करण्याचा माझा प्रयत्न असतो. यशाचं फळ मिळतचं. दररोज चांगलं काम केल्यास लवकरच तुम्ही यशस्वी व्हाल.".
प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली,"प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी खूप मेहनत घेत असते. संहितेवर काम केल्यानंतरच मी सेटवर जाते. कलाकाराचं काम हे अॅक्शन आणि कटच्या मध्ये सुरू असतं. पण एखाद्या प्रोजेक्टसाठी 200 लोक मेहनत घेत असतात. तुमचा चेहरा फक्त त्यांचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे माझा कोणता सिनेमा चालला नाही तर नक्कीच मला वाईट वाटतं".
प्रियांकाला हॉलिवूडमध्येही बॉलिवूडसारखं काम करायचंय..
प्रियांका चोप्राला हॉलिवूडमध्येही बॉलिवूडसारखं काम करायचं आहे. ती म्हणते,"हिंदी मनोरंजनसृष्टीत मी 15 वर्षे काम केलं आहे. तर 6-8 हॉलिवूडपटांमध्ये मी झळकले आहे. पण बॉलिवूडमध्ये जसं विविधतापूर्ण काम करता आलं आहे. तसंच मला हॉलिवूडमध्येही करायचं आहे. स्वत:ला चॅलेंज द्यायला मला आवडेल".
बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी प्रियंका!
'अंदाज' सिनेमाच्या यशानंतर प्रियंका चोप्राने कधीच मागे वळून पाहिलं नाही. प्लॅन, किस्मत, असंभव सारख्या सिनेमांत तिने काम केलं. 2005 मध्ये आलेला 'मुझसे शादी करोगी' या सिनेमातील प्रियंकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तिचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. 2016 साली प्रियंकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका करणारी पहिली बॉलिवूड नायिका ठरली.
संबंधित बातम्या