Zol Zaal : मल्टीस्टारर 'झोलझाल' सिनेमाचे पोस्टर आऊट; 1 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित
Zol Zaal : 'झोलझाल' हा सिनेमा 1 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Zol Zaal : 'झोलझाल' (Zol Zaal) हा सिनेमा 1 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा मल्टीस्टारर सिनेमा असणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. विनोदाची मेजवानी हे महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. अशाच मनोरंजनाची आणि हास्याची मेजवानी 'झोलझाल' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार आहे.
दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात या सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारा आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये अनेक कलाकार दिसत आहेत. सिनेमाचे पोस्टर पाहता सिनेमात विविधांगी भूमिका साकारलेल्या कलाकारांची मांदियाळी सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हास्याची कारंजे घेऊन मराठी कलाकार रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला येत्या 1 जुलैला येत आहेत.
'झोलझाल' सिनेमात तगडी स्टारकास्ट
'झोलझाल' सिनेमात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत 'युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन' अंर्तगत 'झोलझाल' सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सिनेमाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. तर सिनेमाच्या संगीताची बाजू प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी उत्तमरित्या पेलली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरवरील या मल्टीस्टारर सिनेमात नक्की झोल कोण करतंय? आणि काय करतंय? हे प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळणार आहे. पोस्टर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक सिनेमाची सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या