(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक बनवणारा निर्माता वादात; आनंद पंडित आणि संदीप सिंह यांच्यावर लावला फसवणुकीचा आरोप
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक बनवणाऱ्या एका निर्मात्याने अन्य दोन निर्मात्यांवर फसवणुकीचा आरोप केला आहे.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) बायोपिक बनवणाऱ्या एका निर्मात्याने अन्य दोन निर्मात्यांवर फसवणुकीचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' (PM Narendra Modi) हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाची निर्मिती एक नव्हे तर तीन निर्मात्यांनी केली होती. आता या सिनेमाचा एक निर्माता मनीष आर्चायने (Manish Acharya) दुसरे निर्माते आनंद पंडित (Anand Pandit) आणि संदीप सिंहवर (Sandeep Singh) फसवणुकीचा आरोप केला आहे. तसेच या दोघांविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.
मनीष आचार्यची 14 कोटी रुपयांची फसवणूक
मनीष आचार्यने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आनंद पंडीत आणि संदीप सिंहने त्याची 14 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. संदीप सिंह आणि आनंद पंडित यांनी 2019 मध्ये 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मनीष आचार्यसोबत संपर्क साधला होता. तसेच सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्यांना त्यांची गुंतवणूक वसूल करण्याचे पहिले वसुलीचे अधिकार मिळतील, असा दावाही करण्यात आला होता.
मनीष आचार्य पुढे म्हणाला,"आनंद आणि संदीप यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मी या सिनेमात 14 कोटी रुपये गुंतवण्यासाठी मोठं कर्ज घेतलं होतं. 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर 32 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला होता. सिनेमा चांगली कमाई करुनही आनंद पंडित यांनी माझी थकबाकी देण्यास नकार दिला. तसेच कायदेशीर कारवाई न करण्याची धमकीही मला देण्यात आली होती". मनीष आचार्य यांनी मोहालीत तक्रार दाखल केली आहे. यात आनंद पंडित यांनी खोटं आश्वासन देऊन सिनेमात मोठी रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केल्याचं म्हटलं आहे.
'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाबद्दल जाणून घ्.. (PM Narendra Modi Biopic Details)
'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. या सिनेमासाठी आणि त्यातील भूमिकेसाठी विवेकनेदेखील खूप मेहनत घेतली होती. सिनेमा पाहताना त्याची मेहनत प्रेक्षकांना दिसली. विवेक सध्या सिनेसृष्टीपासून दूर असला तरी सोशल मीडियावर मात्र अॅक्टिव्ह आहे. ओमंग कुमारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर अनिरुद्ध चावला आणि विवेक ओबेरॉयने लेखन केलं आहे.
संबंधित बातम्या